मूलच्या दुर्गा विसर्जनावरून राजकीय रणकंदन!
मूलच्या दुर्गा विसर्जनावरून राजकीय रणकंदन!
बाजार चौकातील एकाच मंडळाला २४ तारखेची मुभा? नगराध्यक्ष समर्थांचा पोलिसांवर दबावाचा आरोप
मूल : मूल शहरातील दुर्गा देवी विसर्जनाच्या तारखांवरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सर्व दुर्गोत्सव मंडळांना २१ किंवा २२ ऑक्टोबरलाच विसर्जन करण्यासाठी पोलिसांकडून दबाव टाकला जात असल्याचा गंभीर आरोप नगराध्यक्ष समर्थ यांनी केला आहे. बाजार चौकातील नव्याने स्थापन झालेल्या राजमाता दुर्गा मंडळाला मात्र २४ ऑक्टोबरला विसर्जनाची परवानगी मिळाल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या आरोपांमुळे मूलच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत मूलच्या तीन-चार दुर्गा मंडळ, शारदा मंडळांचे पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष एकता समर्थ यांची भेट घेऊन, आपल्या मंडळाचे विसर्जनास 24 तारीख देण्यास पोलीस नकार देत आहेत याबाबतची तक्रार केली. शहरातील शारदा मंडळ व दुर्गा मंडळाना विसर्जनाची परवानगी देण्यास भेदभाव करीत आहेत असा नगराध्यक्षाकडे आरोप केला. यावरून नगराध्यक्ष एकता समर्थ यांनी पोलिसांची भूमिका दुजाभाव करणारी असल्याचा आरोप केला आहे
ठाणेदारांनी आरोप फेटाळले!
दरम्यान, या प्रकरणी मूल पोलीस ठाण्याचे ठाणेदार विजय राठोड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मागणी केलेल्या मंडळांना २१ आणि २२ ऑक्टोबरलाच विसर्जनाची परवानगी देण्यात आली असून २४ तारखेला परवानगी नाकारली नसल्याची प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीला दिली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता, ज्या दोन मंडळाचा वाद आहे त्या मंडळाला एकाच दिवशी परवानगी न देता वेगवेगळ्या दिवशी परवानगी देण्यात येणार आहे इतर मंडळाला त्यांचे मागणीप्रमाणे 24 तारखेलाही परवानगी देत असल्याची माहिती दिली. पोलिसांवर कुणाचाही दबाव नसून, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न राखून सर्व मंडळांना सहकार्य करीत आहे. मुल पोलिसांच्या सहकार्यामुळेच यापूर्वीचे गणेशोत्सव मस्कऱ्या गणेशोत्सव शांततेत आणि सुरळीत पार पाडले याकडे राठोड यांनी लक्ष वेधले
एका मंडळासाठी नियम वेगळे, इतरांसाठी वेगळे?
मूल शहरातील बाजार चौकात यंदा नव्याने राजमाता दुर्गा मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाला शहरातील बड्या राजकीय मंडळींचा आशीर्वाद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर या मंडळाला २४ ऑक्टोबरला विसर्जनाची परवानगी मिळाली असताना इतर मंडळांना त्याच दिवशी विसर्जनाची परवानगी का नाकारली जात आहे, असा सवाल नगराध्यक्ष समर्थ यांनी उपस्थित केला आहे.
२४ तारखेला केवळ एकाच मंडळाच्या विसर्जनाला गर्दी जमावी, यासाठी इतर मंडळांना त्या दिवशी विसर्जनाची परवानगी नाकारली जात असल्याचा आरोपही समर्थ यांनी केला आहे. त्यामुळे दुर्गा विसर्जनाच्या तारखांचे नियोजन धार्मिक व्यवस्थेसाठी आहे की राजकीय प्रतिष्ठेसाठी? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.
मंडळांवर २१-२२ तारखेचा दबाव; लहान मंडळांचे आर्थिक गणित बिघडणार?
शहरातील अनेक दुर्गोत्सव मंडळांना २४ ऑक्टोबरला विसर्जन करायचे आहे. मात्र, मंडळांच्या पदाधिकाऱ्यांवर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष दबाव टाकून २१ किंवा २२ तारखेलाच विसर्जन करण्यास सांगितले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे.
सर्व मंडळांचे विसर्जन एकाच वेळी उरकल्यास वाद्यपथकांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी, वाद्यपथकांसाठी अवाजवी दर मोजावे लागू शकतात. याचा सर्वाधिक फटका आर्थिकदृष्ट्या मर्यादित असलेल्या लहान दुर्गोत्सव मंडळांना बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
याच पार्श्वभूमीवर अनेक मंडळांनी २४ ऑक्टोबरला विसर्जनाची परवानगी मिळावी, अशी मागणी प्रशासनाकडे केली. नगरपरिषदेने त्यासाठी ना-हरकत दिल्याचे सांगितले जात असताना पोलिसांकडून मात्र बाजार चौकातील एका मंडळाव्यतिरिक्त इतरांना २४ तारखेला परवानगी दिली जाणार नसल्याची भूमिका घेतली जात असल्याचा आरोप नगराध्यक्ष समर्थ यांनी केला आहे.
पोलिसांवर नेमका कोणाचा दबाव?
नगरपरिषदेची ना-हरकत असतानाही इतर मंडळांना २४ तारखेला विसर्जनाची परवानगी मिळत नसेल, तर या निर्णयामागील नेमके कारण काय? एका मंडळाला दिलेली सवलत इतर मंडळांना का नाकारली जात आहे? आणि या संपूर्ण प्रकरणात पोलिसांवर कोणाचा दबाव आहे? असे सवाल नगराध्यक्ष समर्थ यांनी उपस्थित केले आहेत.
दुर्गोत्सव हा श्रद्धेचा आणि सार्वजनिक उत्सवाचा विषय असताना विसर्जनाच्या तारखांवरून मंडळांमध्ये असमानतेची भावना निर्माण होत असेल, तर प्रशासनाने आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक आहे. एका मंडळासाठी २४ तारीख खुली आणि इतरांसाठी बंद, हा नियमांचा समान वापर आहे की राजकीय वजनाचा प्रभाव? हा प्रश्न आता मूल शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.



गणेश विसर्जनासारखे एकाच दिवशी विसर्जन असावे, म्हणजे ध्वनी प्रदुषण आणि वाहतूक कोंडी सारखी-सारखी होणार नाही. राहिला प्रश्न वाद्यांचा तर आपण देवी वाद्यांसाठी बसवित आहोत का, तर नाही.
उत्तर द्याहटवा