संपत्तीपेक्षा सेवाभावाची श्रीमंती मोठी! हिरेन शहा दांपत्याची तीन वर्षांपासून अखंड गोसेवा

संपत्तीपेक्षा सेवाभावाची श्रीमंती मोठी! हिरेन शहा दांपत्याची तीन वर्षांपासून अखंड गोसेवा

दररोज ६० ते ७० किलो कोंद; मुक्या जीवांच्या भोजनासाठी शहा दांपत्याचा त्याचा पुढाकार.



मूल : समाजात श्रीमंत आणि संपन्न माणसांची कमतरता नाही; मात्र आपल्या संपत्तीचा काही भाग मुक्या जीवांच्या सेवेसाठी खर्च करण्याची भावना प्रत्येकामध्ये दिसत नाही. संपत्तीपेक्षा सेवाभावाची श्रीमंती मोठी असते, हे मूल शहरातील प्रसिद्ध उद्योगपती व लक्ष्मीपुत्र हिरेन शहा (गोगरी) आणि त्यांच्या पत्नी डॉ .प्रीती शहा यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. गेल्या तीन वर्षांपासून ऊन, पाऊस आणि कोणत्याही परिस्थितीची तमा न बाळगता हे दांपत्य दररोज गोमातांच्या भोजनाची व्यवस्था करीत आहे.

दररोज पहाटेपासूनच शहा दांपत्याच्या घराच्या परिसरात गोमातांची गर्दी जमू लागते. सकाळी तब्बल ५० ते ६० गाई नियमितपणे भोजनासाठी येतात. एखाद्या मंगलसमारंभात पंक्तीत बसलेल्या पाहुण्यांना आग्रहाने भोजन वाढावे, त्याच आत्मीयतेने शहा दांपत्य प्रत्येक गाईसाठी स्वतंत्र टोपलीत कोंद ठेवून त्यांना भोजन देते. विशेष म्हणजे या गोसेवेसाठी दररोज तब्बल ६० ते ७० किलो कोंद लागतो. यावर दिवसाला साधारण दोन हजार रुपये खर्च केले जातात. म्हणजेच केवळ मुक्या जीवांची भूक भागविण्यासाठी महिन्याकाठी सुमारे ६० हजार रुपयांचा खर्च हे दांपत्य कोणताही गाजावाजा न करता करीत आहे.

विशेष म्हणजे केवळ सकाळीच नव्हे, तर दुपारी दोन वाजताही गोसेवेचा हा उपक्रम सुरू असतो. त्यावेळी आणखी २० ते २५ वेगळ्या गाई त्यांच्या घराच्या परिसरात भोजनासाठी येतात. सकाळी येणाऱ्या गाई आणि दुपारी येणाऱ्या गाई वेगवेगळ्या असल्याचे वैशिष्ट्यही या उपक्रमात पाहायला मिळते.

गोसेवेबरोबरच स्वच्छतेची जबाबदारीही शहा दांपत्य तितक्याच जागरूकतेने पार पाडते. रस्त्यावर गाईंचे भोजन सुरू असल्याने निर्माण होणारी शेण व खाली पडलेल्या कोंदीची ची घाण नंतर पाण्याने धुऊन स्वच्छ केली जाते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, याचीही ते विशेष दक्षता घेतात. सेवाभावासोबत सामाजिक जबाबदारीचे भान जपण्याचा त्यांचा हा प्रयत्न विशेष कौतुकास्पद आहे.

अडचणीच्या काळात मनात उमटलेला विचार अन् सुरू झाली गोसेवा!

या सेवाकार्यामागे एक वेगळीच प्रेरणादायी कहाणी आहे. हिरेन शहा यांनी सांगितल्यानुसार, पत्नी आजारी असताना त्यांनी विविध मंदिरे आणि गोशाळांना भेटी दिल्या. त्या काळात त्यांच्या मनात एक विचार सतत येत होता. आपण अडचणीत असतो, संकटात सापडतो, तेव्हाच देवाची आठवण काढतो, प्रार्थना करतो आणि पुण्यकर्म करण्याचा प्रयत्न करतो. मग ही सेवा आणि प्रार्थना आपण दररोज का करू नये? ती आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग का होऊ नये?

याच आत्मचिंतनातून मूल शहरात गोसेवेचा संकल्प जन्माला आला. सुरुवातीला मनात आलेला हा विचार आज त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ऊन-पावसाची पर्वा न करता हिरेन आणि प्रीती शहा हे दांपत्य नियमितपणे गोमातांची सेवा करीत आहे.

श्रीमंती केवळ संपत्तीत नसते, ती सेवाभावातही असते!

हिरेन शहा हे मूल शहरातील एक प्रसिद्ध उद्योगपती आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न व्यक्तिमत्त्व आहे. मात्र त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील खरे वेगळेपण केवळ त्यांच्या व्यावसायिक यशात नाही, तर संपत्तीबरोबरच त्यांनी जपलेल्या सेवाभावात आहे. समाजात अनेकांकडे आर्थिक सुबत्ता असते; परंतु आपल्या कमाईतील काही हिस्सा आणि आयुष्यातील महत्त्वाचा वेळ मुक्या जीवांच्या सेवेसाठी देण्याची वृत्ती मोजक्याच लोकांमध्ये आढळते. हिरेन शहा यांनी पत्नी प्रीती यांच्या साथीने ही भावना केवळ मनात न ठेवता ती प्रत्यक्ष कृतीत उतरवली आहे.

आजच्या धावपळीच्या जीवनात स्वतःच्या कामातून वेळ काढून दररोज इतक्या नियमितपणे मुक्या जीवांची भूक भागविणे ही निश्चितच साधी गोष्ट नाही. प्रसिद्धीचा किंवा दिखाव्याचा अट्टहास न करता सुरू असलेली ही सेवा इतरांसाठीही प्रेरणादायी आहे.

खरी श्रीमंती बँकेतील ठेवीत किंवा मालमत्तेतच नसते; तर आपल्या हातून किती जीवांची भूक भागते आणि किती जणांच्या जीवनात आनंद निर्माण होतो, यातही असते. हिरेन शहा आणि डॉ प्रीती शहा यांच्या तीन वर्षांच्या अखंड गोसेवेतून हाच माणुसकीचा आणि जीवदयेचा सुंदर संदेश मूल शहराला मिळत आहे.
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!