संजय फ्लेमच्या मुजोरीस आशीर्वाद कुणाचा?

 

संजय फ्लेमच्या मुजोरीस आशीर्वाद कुणाचा?

ओटीपी ग्राहकांचा, सिलिंडर कुणाच्या घरी?

मूलमध्ये गॅस वितरणाचा सावळागोंधळ!

ओटीपी मिळूनही चार-चार दिवस सिलिंडरची प्रतीक्षा; खासगी ग्राहकांना १,५०० रुपयांना विक्री होत असल्याचा आरोप; घरपोच वितरणाला फाटा, ग्राहकांचे एजन्सीमध्ये हेलपाटे



मूल : प्रतिनिधी

मूल येथील संजय फ्लेम गॅस एजन्सीचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका बाजूला नियमित ग्राहकांना घरपोच गॅस सिलिंडर मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागत असताना, दुसऱ्या बाजूला खासगी ग्राहकांना १,५०० रुपये घेऊन सिलिंडर विक्री केली जात असल्याचा गंभीर आरोप होत आहे. ग्राहकांना वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आणि चढ्या दराने विक्री होत असल्याच्या आरोपांमुळे एजन्सीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

मध्य आशियातील परिस्थिती निवळल्यानंतरही मूल शहरातील गॅस वितरणाची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. नियमानुसार सिलिंडरची नोंदणी केल्यानंतर ग्राहकांना ओटीपी प्राप्त होतो. त्यानंतर संबंधित ग्राहकांपर्यंत सिलिंडर पोहोचविण्याची जबाबदारी गॅस एजन्सीची असते. मात्र, प्रत्यक्षात ओटीपी मिळूनही अनेक ग्राहकांना घरपोच सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. नोंदणी करूनही सिलिंडरसाठी ग्राहकांना वारंवार एजन्सीचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

विशेष म्हणजे, ओटीपी प्राप्त झाल्यानंतर चार दिवसांच्या आत सिलिंडरची उचल न केल्यास आधीची नोंदणी रद्द होऊन नव्याने नोंदणी करावी लागत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. याच प्रक्रियेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोपही पुढे येत आहे. ओटीपी मिळाल्यानंतरही चार दिवसांत सिलिंडरचे वितरण होत नाही. त्यानंतर ओटीपीची मुदत संपत असल्याचे सांगून ग्राहकांकडून ओटीपी घेतला जातो; मात्र प्रत्यक्षात सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. या प्रकारामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

एका मोबाईल व्यावसायिकालाही असाच अनुभव आल्याचे सांगण्यात येते. त्यांनी सिलिंडरची नोंदणी करून ओटीपी दिल्यानंतरही तब्बल दहा दिवस सिलिंडर मिळाला नाही. अखेर एजन्सीमध्ये जाऊन जाब विचारल्यानंतर त्यांना सिलिंडर देण्यात आल्याचे समजते. एका ग्राहकाला सिलिंडरसाठी एवढा पाठपुरावा करावा लागत असेल, तर घरपोच वितरणाची प्रतीक्षा करणाऱ्या इतर ग्राहकांचे काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुसरीकडे, नियमित ग्राहकांना सिलिंडरसाठी प्रतीक्षा करावी लागत असताना खासगी ग्राहकांना १,५०० रुपये घेऊन सिलिंडर विक्री केली जात असल्याचा आरोप गंभीर आहे. या आरोपांची सत्यता तपासण्यासाठी एजन्सीकडे उपलब्ध असलेला सिलिंडरचा साठा, ग्राहकांच्या नोंदणीची संख्या, ओटीपी प्राप्त झालेल्या ग्राहकांची माहिती, प्रत्यक्ष वितरण आणि विक्रीच्या नोंदी तपासणे आवश्यक आहे. यामुळे वितरण व्यवस्थेतील नेमकी वस्तुस्थिती स्पष्ट होऊ शकते.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर घराघरांत गॅसची गरज वाढलेली असताना ग्राहकांना सिलिंडरसाठी हेलपाटे मारावे लागत आहेत. ग्राहकांच्या हक्काचे सिलिंडर वेळेवर वितरित होत नसतील आणि दुसरीकडे चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी असतील, तर या प्रकारामागील वस्तुस्थिती समोर येणे गरजेचे आहे.

ग्राहकांच्या हक्काच्या सिलिंडरचे वितरण रोखून काळ्या बाजाराला खतपाणी घातले जात आहे का? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. संजय फ्लेम गॅस एजन्सीच्या कारभाराची पुरवठा विभागाने निष्पक्ष चौकशी करावी. ओटीपी वितरण, सिलिंडरचा साठा, प्रत्यक्ष विक्री आणि घरपोच वितरणाच्या नोंदींची तपासणी करून तक्रारींची सत्यता पडताळावी. अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांकडून होत आहे.

ओटीपी ग्राहकांचा, सिलिंडर कुणाच्या घरी? ग्राहकांना ओटीपी देऊनही सिलिंडर मिळत नसेल आणि दुसरीकडे चढ्या दराने विक्री होत असल्याच्या तक्रारी असतील, तर या प्रकाराला जबाबदार कोण? प्रशासन या तक्रारींची दखल घेऊन ग्राहकांना न्याय देणार का? असा सवाल मूल शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!