मूलचे ज्येष्ठ वैद्यकीय सेवक डॉ. राममोहन बोकारे यांचे निधन
# मूलचे ज्येष्ठ वैद्यकीय सेवक डॉ. राम मोहन बोकारे यांचे निधन
## गुजरीतील अनेक वर्षांच्या वैद्यकीय सेवेला पूर्णविराम; मूल तालुक्यात शोककळा
**मूल : प्रतिनिधी**
मूल शहरातील ज्येष्ठ आणि ख्यातनाम वैद्यकीय व्यावसायिक डॉ. राम मोहन बोकारे यांचे आज नागपूर येथील रुग्णालयात उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने मूल शहरासह संपूर्ण मूल तालुक्यात शोककळा पसरली आहे.
डॉ. बोकारे यांनी मूल शहरातील गुजरी परिसरात अनेक वर्षांपासून आपला दवाखाना चालवून रुग्णसेवेचे व्रत अखंडपणे जोपासले होते. अनेक वर्षे त्यांनी मूल तालुक्यातील नागरिकांना वैद्यकीय सेवा दिली. त्यांच्या अनुभवाचा, सेवाभावी वृत्तीचा आणि रुग्णांशी असलेल्या आपुलकीच्या नात्याचा अनेकांना लाभ झाला. केवळ वैद्यकीय उपचारच नव्हे, तर रुग्णांना धीर आणि विश्वास देणारे डॉक्टर म्हणूनही त्यांची ओळख होती.
वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासोबतच डॉ. बोकारे हे शिक्षण प्रसारक मंडळ, मूलचे पदाधिकारी म्हणूनही कार्यरत होते. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचा सहभाग होता.
त्यांच्या पश्चात पत्नी, इंजिनिअर स्नेहल व डॉक्टर उज्ज्वल अशी दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे.
मूल तालुक्यात अनेक वर्षे आरोग्यसेवेच्या माध्यमातून जनतेशी जिव्हाळ्याचे नाते निर्माण करणाऱ्या डॉ. राम मोहन बोकारे यांच्या निधनाने वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
**भावपूर्ण श्रद्धांजली!**



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!