बोथलीत सार्वजनिक उत्सवात दलित महिलांचा अपमान - कारवाई करण्यास सावली पोलिसांची टाळाटाळ @ पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदन सादर
बोथलीत सार्वजनिक उत्सवात दलित महिलांचा अपमान - कारवाई करण्यास सावली पोलिसांची टाळाटाळ
@ पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदन सादर
सावली : तालुक्यातील बोथली येथे शारदा सार्वजनिक उत्सवदरम्यान दलित महिलांना खालच्या जातीच्या भावनेतून स्वयंपाक करण्यास मज्जाव करुन अपमान करण्यात आला. याबाबत महिलांनी आठवडाभरापूर्वी सावली पोलीस स्टेशनला तक्रार दिली मात्र अशा गंभीर प्रकरणाकडे सावली पोलीस दुर्लक्ष करीत कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याची तक्रार महिलांनी समाजाच्या संघटनेमार्फत वरिष्टांकडे तक्रार दिली आहे.
तक्रारकर्त्या महिलांच्या म्हणण्यानुसार, मागील वर्षी गावातील महिलांनी एकत्र येऊन संयुक्त शारदा महिला मंडळाची स्थापना केली होती. मंडळाच्या शारदोेत्सवात त्या सहभागी झाल्या होत्या. मात्र, यावर्षी शारदा उत्सवादरम्यान दलित समाजातील महिला असल्याच्या कारणावरून मंडळातील काही महिलांकडून जेवण बनविणे व वाढणे या कामासाठी अडविण्यात आले. जात, धर्म, पंथ आणि समाजाच्या नावावर माणसा माणसांत भिंती उभ्या करणे ही समाजाची प्रगती नसून अधोगती आहे. कोणताही समाज मोठा किंवा छोटा नसतो; प्रत्येक माणसाला सन्मानाने जगण्याचा समान अधिकार आहे. मात्र बोथली येथे महिलांचा जातीयवाचक शब्दांनी अपमान करणे, सामाजिक कार्यक्रमांतून दूर ठेवणे आणि जातीच्या आधारावर भेदभाव करुन अपमानित केले. याबाबत ६ महिलांनी आठवड्याभरापूर्वी सावली पोलीस स्टेशनला तक्रार दिली मात्र राजकीय दबावातून कारवाई होतं नसल्याचा आरोप महिलांनी केला आहे.
गावातील महिला पुरुषांनी उपविभागीय पोलीस अधिकारी मूल, जिल्हा पोलीस अधिक्षक चंद्रपूर व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांचेकडे आरोपीवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी यामिना कोरेवार, मीनाक्षी पोवरे, वैशाली पेडलवार, प्रेमिला कोरेवार, आशा कोरेवार, शालिनी कोरेवार, भावना कोरेवार या पिढीत महिलांसह समाजबांधवानी केली आहे. अन्यथा ५ नोव्हेंबर पासून पोलीस स्टेशन सावलीसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!