स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात शिवसेनेचा एल्गार; १५ दिवसांत निर्णय न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा
परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसविणे थांबवा, जुने मीटर पुन्हा बसवा आणि वाढीव वीज बिलांची चौकशी करा – महावितरणला निवेदन
शहर - प्रतिनिधी ( किशोर जुमळे )
पवनी : - पवनी शहरात महावितरणकडून ग्राहकांच्या संमतीशिवाय सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्यात येत असल्याचा आरोप करत शिवसेना पवनीच्या वतीने उपकार्यकारी अभियंता, महावितरण कार्यालय, पवनी यांना निवेदन सादर करण्यात आले. शहरप्रमुख डॉ. अनिल धकाते यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या या निवेदनात स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम तात्काळ थांबविणे, बसविण्यात आलेले नवीन मीटर काढून पूर्वीचे मीटर पुन्हा बसविणे तसेच वाढीव वीज बिलांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, महावितरणकडून ग्राहकांना कोणतीही पूर्वसूचना किंवा संमती न घेता स्मार्ट मीटर बसविले जात असून त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. अनेक ग्राहकांना स्मार्ट मीटर बसवल्यानंतर अवास्तव व वाढीव वीज बिले येत असल्याच्या तक्रारी समोर येत असल्याने या संपूर्ण प्रक्रियेची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
शिवसेनेने महावितरणच्या या कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि मजूर वर्ग आर्थिक अडचणीत सापडल्याचा आरोप केला असून, जनतेच्या हिताचा विचार करून तातडीने योग्य निर्णय घेण्याची मागणी केली आहे.
यावेळी शिवसेनेच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला की, १५ दिवसांच्या आत सकारात्मक निर्णय न झाल्यास आणि सक्तीने स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम सुरूच राहिल्यास महावितरण कार्यालयासमोर तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. या आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस महावितरण प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला.
या निवेदनाला नरेश बावनकर, नामदेव भाऊ सुरकर, देवराज भाऊ बावनकर, संजय पुरी वैकुंठे, धनराज उपरीकर, गणेश जांभुळे, गोपाल पिसे, राहुल नंदनवार, सौ. मायाताई खोब्रागडे, सौ. रीता मेश्राम, सौ मीना धकाते, श्रीकांत तुळसकर, जनार्धन दलाल, योगेश निखारे, हरिदास करपाते, जागोजी बावनकर, श्रीकृष्ण मालोदे आणि तुलसीभाऊ वंजारी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!