गैरहजर राहणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना बसणार चाप - ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रिक हजेरी प्रणालीची अंमलबजावणी होणार @ प्रफुल निरूडवार यांच्या मागणीला यश
सावली - ग्रामपंचायत कार्यालयात कार्यालयीन वेळेत अधिकारी नसल्याने जनतेला अनेकदा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेत सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांनी याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्याने जिल्हा परिषदेने शासकीय परिपत्रकाचे संदर्भ देत बायोमॅट्रिक हजेरी प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीना आदेश दिले आहे.
पंचायतराजमधील सर्वात खालची पण महत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे ग्रामपंचायत. ग्रामपंचायतीचा कारभार महाराष्ट्रात लागू असणारा मुंबई ग्रामपंचायत कायदा १९५८ कलम ५ अन्वये चालतो. गावातील जनतेपर्यंत शासनाच्या विकासाच्या योजना पोहचविण्याचे महत्वाचे काम ग्रामपंचायत करीत असते. ग्रामपंचायतचा शासकीय कामकाज पाहण्यासाठी प्रमुख अधिकारी म्हणून ग्रामपंचायत अधिकारी (ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी) यांची प्रमुख जबाबदारी असून शासकीय योजनांची अंमलबजावणी, शासकीय दस्ताऐवज सांभाळणे, प्रमाणपत्र देणे, ग्रामसभेचे कामकाज चालवीने हे असते. कार्यालयात उपस्थित राहण्याची वेळ सकाळी ९.४५ ते सायंकाळी ६.१५ पर्यंत असतांना मात्र हे अधिकारी कार्यालयीन वेळेत कधीच कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचा अनुभव नागरिकांना येत असतो. जिल्हा परिषद, पंचायत समितीत प्रशासक काळ असल्यापासून तर कोणाचेच वचक नसल्याने गैरहजर राहण्याचे प्रमाण अधिकच वाढले आहे. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यकर्ते प्रफुल निरूडवार यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषद प्रशासनाकडे बायोमॅट्रिक हजेरी प्रणालीची अंमलबजावणी करण्याचे आग्रह धरला. नुकतेच जिल्हा परिषदेचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी मिना साळुंके यांनी महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभागाच्या विविध संदर्भ देत जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीना ग्रामपंचायत कार्यालयात बायोमॅट्रिक हजेरी प्रणाली सक्तीचे करण्याचे आदेश दिले आहे. यामुळे जिल्ह्यातील कामचोर अधिकाऱ्यांना चाप बसणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!