प्रबोधन मंडळ शेगाव बु. तर्फे गुणवंत विद्यार्थी व समाजभूषणांचा गौरव

तालुका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - प्रबोधन मंडळ, शेगाव बु. यांच्या वतीने गेल्या २६ वर्षांपासून गावातील गुणवंत विद्यार्थी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्याची परंपरा अखंडपणे जपली जात आहे. याच परंपरेनुसार यावर्षीही गुणवंत विद्यार्थी व विशेष सत्कारमूर्तींचा गौरव सोहळा उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेगाव बु. येथील प्रतिष्ठित व्यापारी मनोहरराव लोणकर हे होते. प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून प्रा. महेश डोंगरे (हिरालाल लोया कनिष्ठ महाविद्यालय, वरोरा) उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना "शैक्षणिक ज्ञानासोबत शारीरिक आणि मानसिक आरोग्य जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे," असा प्रेरणादायी संदेश दिला.
यावेळी सन २०२५–२६ शैक्षणिक वर्षातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बारावीमध्ये मुलींमधून प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या कु. राखी भास्कर गराटे (७६.००%), दहावीमध्ये कु. अनुष्का नंदकिशोर कोकुडे (९४.२०%), राम गुणवंत तपासे (९१.००%), तसेच चौथीमध्ये कु. सिया परमानंद मैद (९२.१४%) आणि शिवम प्रवीण भिलकर (९४.५७%) यांचा विशेष गौरव करण्यात आला.

विशेष सत्कारमूर्ती म्हणून कर्तव्य त्रिशूल बोंदगुलवार (राज्यस्तरीय उत्तुंग तेज बालवैज्ञानिक (ISRO) स्पर्धेत राज्यात सातवा क्रमांक), आशिष कोटकर (सामाजिक कार्यकर्ता), राकेश तुळशीराम भुतकर (सर्पमित्र व पर्यावरणप्रेमी) आणि कुणाल जितेंद्र निखारे (उद्योनमुख उद्योजक) यांचा सत्कार करण्यात आला.

दहावीच्या विषयनिहाय गुणवंत विद्यार्थ्यांचाही यावेळी गौरव करण्यात आला. कु. समृद्धी राजेश शेरकी हिने मराठी विषयात ९५ गुण, कु. अनुष्का नंदकिशोर कोकुडे हिने हिंदी (९४), गणित (९४) आणि विज्ञान (९५) या तीन विषयांत उत्कृष्ट गुण मिळविले. कु. रिदा जलील शेख हिने इंग्रजी विषयात ९६ गुण, तर पार्थ अमोल चांदेकर याने सामाजिक शास्त्र विषयात ९० गुण प्राप्त करून विशेष यश संपादन केले.

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांचाही मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी आणि प्रबोधन मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन प्रबोधन मंडळाच्या सदस्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!