सावित्रीबाई फुले विद्यालयात 'शाळा प्रवेशोत्सव' संपन्न.विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप;मान्यवरांनी दिले गुणवत्तेचे धडे:
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.०६/०७/२०२६ येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात नुकताच 'शाळा प्रवेशोत्सव' अत्यंत उत्साहात आणि आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पवनी नगरपरिषदेच्या लोकप्रिय नगराध्यक्षा डॉ.विजयाताई नंदुरकर तर प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी संजयकुमार वासनिक,उपशिक्षणाधिकारी लक्ष्मण पेंदाम,सामाजिक कार्यकर्ते संजय पुरी वैकुंठे,शिक्षणप्रेमी धनराज उपरीकर आणि विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली.त्यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी आपल्या प्रास्ताविकातून शाळेची प्रगती आणि प्रवेशोत्सवाचे महत्त्व स्पष्ट केले.
गुणवत्तेसाठी सातत्य महत्त्वाचे: मान्यवर:
अध्यक्षपदावरून बोलताना डॉ. विजयाताई नंदुरकर यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता ठेवण्याचे आवाहन केले. गटशिक्षणाधिकारी संजयकुमार वासनिक यांनी शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जिद्दीवर भर द्यावा,तर उपशिक्षणाधिकारी लक्ष्मण पेंदाम यांनी "नियमित अभ्यास केल्यास यश निश्चित मिळते," असा मोलाचा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना नवीन पाठ्यपुस्तके, शैक्षणिक साहित्य आणि गणवेशाचे वाटप करण्यात आले.साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांचे चेहरे आनंदाने फुलले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी केले,तर आभार प्रदर्शन अरुणा कांबळे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संदीप मुंडले,ललिता डेकाटे,विना जिभकाटे यांच्यासह शालेय कर्मचारी,पालक आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!