गोसे धरणातून अचानक पाण्याचा विसर्ग; ढीवर समाजावर उपजीविकेचे भीषण संकट

पंचनामे, नुकसानभरपाई, पुनर्वसन व रेतीघाट चौकशीची विदर्भ युवा क्रांती संघटनेची मागणी

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - गोसे धरणाचे तब्बल २७ दरवाजे सुमारे अर्धा मीटर उघडून अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढली. या अचानक वाढलेल्या पाण्यामुळे नदीकाठावर बांधून ठेवलेले डोंगे, मासेमारीची जाळी, दोरखंड व इतर साहित्य वाहून गेले किंवा मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाले. परिणामी विलम सावरला, भोजापूर, धानोरी, कोंदुर्ली, ईसापूर, उमरी, पौना, शिवनाळा, मांगली, जुनोना, कुर्जा, मेंढा, कोरंभी, पवनी आदी गावांतील शेकडो ढीवर समाजाच्या कुटुंबांवर उपजीविकेचे गंभीर संकट ओढवले आहे.

मात्र ही घटना केवळ अचानक पाणी सोडल्यामुळे झालेल्या नुकसानीपुरती मर्यादित नसून, ढीवर समाजावर गेल्या अनेक वर्षांपासून विविध धोरणांमुळे संकटांची मालिका सुरू असल्याचा आरोप विदर्भ युवा क्रांती संघटनेने केला आहे.
संघटनेच्या निवेदनानुसार, गोसे धरण प्रकल्प उभारल्यानंतर ढीवर समाजाचा पारंपरिक मासेमारी व डांगरवाड्याचा व्यवसाय जवळपास उद्ध्वस्त झाला. त्यानंतर धरणाच्या पाण्यावर आधारित सिंचन योजना, विविध जलप्रकल्प व विकासकामे राबविण्यात आली. या प्रकल्पांमधून शासन व इतर घटकांना लाभ झाला; मात्र ज्यांच्या पारंपरिक उपजीविकेवर त्याचा थेट परिणाम झाला त्या ढीवर समाजासाठी कोणतेही प्रभावी पुनर्वसन, पर्यायी रोजगार किंवा आर्थिक नियोजन करण्यात आले नाही.

याशिवाय नदीपात्रातील २४ रेतीघाटांचा शासनाने लिलाव केला असून, मंजूर क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात रेती उपसा होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येत आहेत. अतिरिक्त रेती उपशामुळे नदीपात्राचा नैसर्गिक समतोल बिघडून नदीचा प्रवाह थेट किनाऱ्यावर आदळत असल्याने मोठ्या प्रमाणात धूप होत आहे. त्यामुळे नदीकाठावरील घरे, वस्त्या व मालमत्ता धोक्यात आल्या असून अनेक ठिकाणी नदीचे काठ कोसळण्याच्या घटना घडत आहेत. भविष्यात मोठ्या जीवितहानीची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे.

ढीवर समाजाच्या रोजगार, निवारा आणि उपजीविका या तिन्ही मूलभूत गरजा गंभीरपणे बाधित झाल्या आहेत. गोसे धरणामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसाय संपुष्टात आला, अतिरिक्त रेती उपशामुळे नदीकाठावरील वस्त्या धोक्यात आल्या आणि पावसाळ्यात मासेमारी बंद असतानाच अचानक पाणी सोडल्यामुळे उरलेली मासेमारीची साधनेही वाहून गेल्याने कुटुंबांपुढे जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

नदीकाठावरील गावांमधील ढीवर समाजाची आर्थिक, सामाजिक व मानसिक परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असून अनेक कुटुंबे नैराश्याच्या अवस्थेत असल्याचे संघटनेने म्हटले आहे. विदर्भ युवा क्रांती संघटना बाधित कुटुंबांचे समुपदेशन करून त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करत असली तरी शासनाच्या तातडीच्या हस्तक्षेपाशिवाय परिस्थिती नियंत्रणात येणे कठीण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संघटनेने प्रशासनाकडे विविध मागण्या केल्या आहेत. त्यामध्ये सर्व बाधित गावांमध्ये तातडीने संयुक्त पंचनामे करणे, नुकसानग्रस्त मासेमारांना आर्थिक मदत जाहीर करणे, वाहून गेलेल्या डोंगे व मासेमारी साहित्याची पूर्ण नुकसानभरपाई देणे, धूपग्रस्त वस्त्यांचे सर्वेक्षण करून धोकादायक क्षेत्र घोषित करणे, धोक्यातील कुटुंबांचे पुनर्वसन करणे, २४ रेतीघाटांवरील अतिरिक्त रेती उपशाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करणे, तसेच ढीवर समाजासाठी स्वतंत्र पुनर्वसन, कायमस्वरूपी रोजगार व आर्थिक सक्षमीकरणाची विशेष योजना जाहीर करण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच मासेमारीसाठी उपलब्ध असलेले शासन व जिल्हा परिषद तलाव पुन्हा प्राधान्याने ढीवर समाजालाच उपलब्ध करून द्यावेत, युवक-युवतींसाठी कौशल्य विकास व स्वयंरोजगार योजना सुरू कराव्यात आणि संपूर्ण प्रकरणाची जिल्हास्तरीय उच्चस्तरीय समितीद्वारे चौकशी करण्यात यावी, अशीही मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

दरम्यान, हे निवेदन प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसांच्या आत शासन व प्रशासनाने ठोस निर्णय न घेतल्यास विदर्भ युवा क्रांती संघटना व ढीवर समाजाच्या वतीने लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. आवश्यक असल्यास रेतीघाटांवर, शासकीय कार्यालयांसमोर व अन्य ठिकाणी व्यापक जनआंदोलन उभारले जाईल. आंदोलनातून निर्माण होणाऱ्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी शासन व प्रशासनाची राहील, असेही संघटनेने स्पष्ट केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!