उप कृषी अधिकारी भुमेश नवखरे यांना 'डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भस्तरीय कृषीरत्न पुरस्कार' प्रदान!
तहसीलदार सतीश साळवे यांच्यासह अनेक मान्यवरांची सत्कार सोहळ्याला उपस्थिती
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - पवनी (जिल्हा भंडारा) - कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून शेतकरी बांधवांना समृद्धीचा मार्ग दाखविणाऱ्या पवनी तालुक्यातील कोंढा २ चे उप कृषी अधिकारी भुमेश नवखरे यांना 'डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भस्तरीय कृषीरत्न पुरस्कार २०२६' देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, शाखा - पवनी तालुका, जिल्हा भंडारा यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला.
भुमेश नवखरे यांनी कृषी क्षेत्रामध्ये सातत्याने महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या योग्य मार्गदर्शनाचा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचा पवनी व भंडारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधवांना प्रत्यक्ष लाभ मिळाला असून, त्यांच्या शेतीमध्ये सकारात्मक बदल घडून आले आहेत. त्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी केलेल्या याच अविरत कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघातर्फे त्यांना विदर्भस्तरीय कृषीरत्न पुरस्काराने व सन्मानपत्राने सन्मानित करण्यात आले.
भव्यदिव्य अशा सत्कार व पुरस्कार सोहळ्याला उदघाटक म्हणून पवनीचे तहसीलदार सतीश साळवे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार किशोर राऊत, गटशिक्षणाधिकारी संजयकुमार वासनिक, चिमूर तालुकाध्यक्ष केवलसिंग जुनी,पत्रकार प्रशांत पिसे,शेखर बोरकर यांच्यासह इतर प्रशासकीय अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे राज्य उपाध्यक्ष तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष महेश पानसे, पवनी तालुकाध्यक्ष जयेंद्र चव्हाण, तालुका संघटक प्रकाश हातेल आणि तालुका कार्याध्यक्ष मनोहर मेश्राम यांच्या हस्ते हा सन्मान सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनी, नागरिक व पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुरस्कार मिळाल्याबद्दल आनंद व्यक्त करतांना भुमेश नवखरे यांनी सांगितले की, हा पुरस्कार म्हणजे माझ्या एकट्याचा सन्मान नसून मला नेहमीच साथ देणारे माझे सर्व शेतकरी बांधव आणि सहकारी मित्र यांचा हा गौरव आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात शेतकरी बांधवांसाठी आणखी जोमाने आणि समर्पित भावनेने काम करण्याची प्रेरणा मला मिळाली आहे.
या यशाबद्दल कृषी विभागातील वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि जिल्ह्यातील शेतकरी बांधवांकडून भुमेश नवखरे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!