बोथली –सावली - हरंबा सिमेंट काँक्रिट रस्त्याकरिता २०० कोटींचा निधी मंजूर @ विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या प्रयत्नांना मोठे यश

 सावली - ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील सावली तालुक्यातील नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या बोथली –सावली - लोंढोली -हरंबा ( २५ किमी) मार्गाच्या सिमेंट काँक्रिट रस्त्याच्या कामासाठी तब्बल २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधी मंजुरीमुळे परिसरातील अनेक गावांच्या विकासाला गती मिळणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी विधिमंडळ काँग्रेस पक्षनेते तथा ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे अखेर या मागणीला यश मिळाले आहे.

          सावली तालुक्यातील बोथली, सावली - जीबगाव -हरंबा, आणि परिसरातील अनेक गावांना जोडणारा हा मार्ग अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत होता. पावसाळ्यात रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडत असल्याने नागरिक, विद्यार्थी, शेतकरी आणि व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः शेतमाल बाजारपेठेत नेण्यासाठी शेतकऱ्यांना वाहतुकीचा अतिरिक्त खर्च सहन करावा लागत होता. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले होते. या समस्येची गंभीर दखल घेत आ. विजय वडेट्टीवार यांनी शासन स्तरावर वारंवार पाठपुरावा केला. संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी बैठका घेऊन या मार्गाचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अखेर या मार्गाच्या सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी २०० कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. प्रस्तावित रस्ता सिमेंट काँक्रिट स्वरूपात उभारण्यात येणार असल्याने तो अधिक मजबूत, टिकाऊ आणि सर्व ऋतूंमध्ये वाहतुकीसाठी सुरक्षित ठरणार आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील गावांचा संपर्क सुधारेल, प्रवासाचा वेळ कमी होईल तसेच औद्योगिक, शैक्षणिक आणि कृषी विकासाला चालना मिळेल. याशिवाय स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होण्यासही मदत होणार आहे.

         यावेळी आ. विजय वडेट्टीवार यांनी सांगितले की, "मतदारसंघातील विकासकामांसाठी मी नेहमीच कटिबद्ध आहे. बोथली –सावली -हरंबा (२५ किमी) मार्ग हा नागरिकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असून या रस्त्यासाठी निधी मंजूर झाल्याने विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होणार आहे. दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने आवश्यक ती कार्यवाही करावी."निधी मंजूर झाल्याची माहिती समोर येताच परिसरातील नागरिक, शेतकरी, व्यापारी आणि विविध सामाजिक संघटनांनी आ. विजय वडेट्टीवार यांचे आभार व्यक्त केले आहेत. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होऊन विकासाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!