नगर परिषदेच्या जागेचे रक्षण करण्यासाठी "समर्थ" नेतृत्व; बेकायदेशीर बांधकामावर झाली बुलडोझर कारवाई"



मुल : आठवडी बाजार परिसरातील नगर परिषदेच्या मालकीच्या जागेवर कोंबडी विक्रेत्यांकडून सुरू करण्यात आलेल्या बेकायदेशीर आरसीसी पक्क्या बांधकामामुळे शहरात गेल्या काही दिवसांपासून मोठी चर्चा सुरू होती.
नगर परिषदेच्या जागेवर कोणतीही परवानगी न घेता पक्के बांधकाम उभारले जात असल्याचा आरोप करत नागरिकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. या प्रकरणात काही जबाबदार पदाधिकाऱ्यांच्या संगनमताने आर्थिक व्यवहार झाल्याची शंका नागरिकांकडून व्यक्त केली जात होती.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता नगर परिषदेने संबंधितांना नोटीस बजावत बांधकाम थांबविले होते. मात्र, हे अतिक्रमण तातडीने तोडण्यात यावे, अशी मागणी भाजप युवा मोर्चाचे शहर उपाध्यक्ष सूरज मांदाडे यांनी नगर परिषद प्रशासनाकडे केली होती.
दरम्यान, नगर परिषदेच्या मालकीची जागा बळकावण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत नागरिकांमध्येही नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. अखेर आज मुख्याधिकारी यांच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेच्या पथकाने बुलडोझरच्या सहाय्याने सदर अतिक्रमण पूर्णपणे जमीनदोस्त केले.
विशेष म्हणजे काही नगरसेवकांकडून हे बांधकाम वाचविण्यासाठी प्रयत्न झाल्याची चर्चा शहरात सुरू असतानाच, नगराध्यक्ष एकता समर्थ आणि बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी शहर विकासाच्या दृष्टीने कठोर भूमिका घेत अतिक्रमण हटविण्याचा निर्णय घेतला.
नगर परिषदेच्या जागेचे संरक्षण करण्यासाठी घेतलेल्या या भूमिकेचे अनेक नागरिकांनी स्वागत केले आहे. मात्र, अतिक्रमण होत असताना प्रशासनाची भूमिका काय होती आणि हे बांधकाम सुरू होईपर्यंत दुर्लक्ष का झाले, यावरून आता राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
नगर परिषदेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याऐवजी अतिक्रमणाला पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकाबाबत  नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू असून, या प्रकरणातून शहरातील राजकारणाला नवा मुद्दा मिळाल्याचे चित्र आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!