नोटीसमधील चुका उघड केल्याने नगरसेविकेला गुन्ह्याची धमकी? नगराध्यक्षांचे पती प्रशांत समर्थ यांचे सदस्यत्व रद्द करा; प्राची आक्केवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
नोटीसमधील चुका उघड केल्याने नगरसेविकेला गुन्ह्याची धमकी?
नगराध्यक्षांचे पती प्रशांत समर्थ यांचे सदस्यत्व रद्द करा; प्राची आक्केवार यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
भाजपच्या पत्रकार परिषदेत गंभीर आरोप; नगरपरिषद प्रशासनाच्या कामकाजावरही सवाल
मूल | प्रतिनिधी
नगर परिषदेच्या अध्यक्षांनी काढलेल्या अधिकृत सर्वसाधारण सभेच्या नोटीसमधील चुका उघड केल्याने नगराध्यक्षांचे पती तथा बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी नगरसेविका प्राची आक्केवार यांना गुन्हा दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप करीत, त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका प्राची आक्केवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. याबाबतची माहिती भाजपच्या वतीने आज मूल येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मूल नगरपरिषदेच्या दि. ३ ऑगस्ट रोजीच्या सर्वसाधारण सभेच्या नोटीसमध्ये अनेक शुद्धलेखन व व्याकरणाच्या चुका असल्याचा मुद्दा नगरसेविका प्राची आक्केवार यांनी दि. १० ऑगस्ट रोजी झालेल्या मासिक सर्वसाधारण सभेत उपस्थित केला होता. विशेषतः क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचाही चुकीचा उल्लेख नोटीसमध्ये झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांनी आपली चूक मान्य करून माफी मागितली. मात्र त्यानंतर सदर नोटीस सोशल मीडियावर प्रसारित झाल्याने नगराध्यक्षांचे पती तथा बांधकाम सभापती प्रशांत समर्थ यांनी प्राची आक्केवार यांना उद्धटपणे बोलून, “तुम्ही दोन दिवसांपूर्वी नगरपरिषदेत ठिय्या आंदोलन केले होते. मी तुमच्या सर्वांवर ३५३ प्रमाणे गुन्हा दाखल करायला लावीन,” अशा आशयाची धमकी दिल्याचा आरोप आक्केवार यांनी केला आहे.
प्रश्न विचारणे गुन्हा आहे का असा सवालही त्यांनी केला.
नगरपरिषदेच्या अधिकृत नोटीसमधील चुका निदर्शनास आणून देणे हा लोकप्रतिनिधी म्हणून आपला अधिकार आहे. या प्रश्नाचे उत्तर देण्याची जबाबदारी नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांची असताना, नगराध्यक्षांचे पती प्रशांत समर्थ हेच नगरसेवकांना धमकावत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.
“नगराध्यक्षांचे पती म्हणून प्रशांत समर्थ यांना कोणताही स्वतंत्र प्रशासकीय अधिकार नाही. तरीही नगरपरिषदेच्या प्रश्नांमध्ये ते हस्तक्षेप करून नगरसेवकांवर दबाव निर्माण करीत आहेत,” असा आरोप भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकासाठी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी ₹२५ लाखांचा निधी मंजूर केला आहे. मात्र सुमारे नऊ महिने नगरपरिषदेकडून लेआउट उपलब्ध करून देण्यात आले नसल्याने भाजपने आंदोलन केले होते.
आंदोलनानंतर प्रशासनाकडून लेआउट देण्याची प्रक्रिया सुरू झाली असताना प्रशांत समर्थ यांनी संबंधित अभियंता/अधिकाऱ्यावर दबाव आणून लेआउट देण्याचे काम थांबविल्याचा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला. या प्रकरणाचीही स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी
नगरसेविका प्राची आक्केवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत धमकीच्या घटनेची स्वतंत्र चौकशी, दि. १० ऑगस्टच्या सभेचे इतिवृत्त व उपलब्ध ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासणे, तसेच स्मारकाच्या लेआउट प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
आरोप चौकशीत सिद्ध झाल्यास प्रशांत समर्थ यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमातील लागू तरतुदींनुसार कारवाई करून त्यांचे नगरसेवक पद रद्द करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी आक्केवार यांनी केली आहे.
पत्रकार परिषदेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनालाही सवाल केला. नगरपरिषदेच्या कामकाजाबाबत नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केल्यानंतर त्यांना अधिकृत उत्तर मिळण्याऐवजी धमक्या दिल्या जात असतील, तर हा लोकशाही प्रक्रियेवरील दबाव असल्याचे त्यांनी म्हटले.
“नोटीसमधील चुका दाखविणे हा गुन्हा नाही; मात्र चुका दाखविणाऱ्या लोकप्रतिनिधीला गुन्हा दाखल करण्याची धमकी देणे गंभीर बाब आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई झालीच पाहिजे,” अशी भूमिका भाजपने पत्रकार परिषदेत मांडली.
पत्रकार परिषदेला मूळ शहर भाजपा अध्यक्ष प्रवीण मोहुर्ले, नगरसेविका अश्विनी निकोडे, प्रा. किरण कापगते, माजी नगराध्यक्ष उषा शेंडे, मिलिंद खोब्रागडे, मनीषा गानलेवार, प्रशांत बोबाटे, सुरज मांदाळे यांचे सह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, प्रशांत समर्थ यांची या आरोपांवरील भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यांची बाजू उपलब्ध झाल्यास तीही प्रसिद्ध करण्यात येईल.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!