मयुरी सुपारे आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; गर्भपाताच्या आरोपांनंतर दवाखान्यावर धाड, औषधसाठा जप्त; डॉक्टर फरार शोधमोहिम सुरू

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा तालुक्यातील शेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साखरा-वडगाव परिसरातील मयुरी हरिदास सुपारे यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या कथित सुसाईड नोटमध्ये शेगाव येथील एका डॉक्टरांच्या दवाखान्यात गर्भपात झाल्याचा उल्लेख असल्याचा दावा नातेवाईकांनी केला आहे. या आरोपांच्या अनुषंगाने शेगाव पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरू केला असून यापूर्वी महिलेच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाच्या तपासादरम्यान मंगळवारी रात्री महसूल, पोलीस, आरोग्य व अन्न व औषध प्रशासनाच्या संयुक्त पथकाने शेगाव बु. येथील डॉ. विष्णू महानंद विश्वास यांच्या दवाखान्यावर छापा टाकला. या कारवाईत विविध प्रकारची औषधे, इंजेक्शने, सलाईन, शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी उपकरणे तसेच काही प्रतिबंधित स्वरूपाच्या औषधांचा साठा जप्त करण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली.
या संयुक्त कारवाईत महसूल विभागाचे लोखंडे, पोलीस उपनिरीक्षक सुमित कांबळे, पोलीस शिपाई ज्ञानेश्वर केकान, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बोरकर, औषध निरीक्षक अश्विनी गेडाम, वैद्यकीय अधिकारी डॉ. रिजवाना परविन शेख, डॉ. संतोष झाडे व डॉ. बोबडे यांचा सहभाग होता. जप्त करण्यात आलेल्या साहित्याबाबत पुढील तपास सुरू असून संबंधित अहवाल शेगाव पोलीस ठाण्यात सादर करण्यात आला आहे.
दरम्यान, तपासाच्या अनुषंगाने संबंधित डॉक्टरांचा शोध सुरू असून ते सध्या उपलब्ध नसल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
यावेळी पंचनामा सुरू असताना संबंधित डॉक्टर घटनास्थळी उपस्थित होते, मात्र पंचनामा पूर्ण झाल्यानंतर ते तेथून फरार झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. या संदर्भात अधिकृतरीत्या कोणतीही माहिती पोलिसांकडून जाहीर करण्यात आलेली नसून, तपास पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!