इंदिरा नगर, आझाद वार्डातील रस्ते, घरकुल व कायमस्वरूपी पट्ट्यांसाठी नगरसेवक इरफान खान पठाण यांच्या नेतृत्वात मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची मागणी

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील चिमूर नगर परिषद क्षेत्रातील प्रभाग क्रमांक. ४ अंतर्गत येणाऱ्या इंदिरा नगर व आझाद वार्डातील नागरिकांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मूलभूत समस्यांवर तातडीने तोडगा काढावा, या मागणीसाठी कर्तव्यदक्ष नगरसेवक इरफान खान पठाण यांच्या नेतृत्वात चिमूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.

सादर करण्यात आलेल्या निवेदनात इंदिरा नगर व आझाद वार्डातील नागरिकांना अद्यापही पक्क्या रस्त्यांसारख्या मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत असल्याचे नमूद करण्यात आले. परिसरातील अनेक रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय असून पावसाळ्यात चिखल, खड्डे व साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच रुग्णांना दैनंदिन प्रवास करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने तातडीने दर्जेदार सिमेंट काँक्रीट अथवा डांबरी रस्त्यांची उभारणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

याशिवाय, अनेक पात्र कुटुंबे आजही घरकुल योजनेच्या लाभापासून वंचित असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. शासनाच्या विविध घरकुल योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांना तातडीने उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच प्रलंबित प्रस्तावांना मंजुरी देऊन गरजू नागरिकांना स्वतःच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने सकारात्मक भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली.

इंदिरा नगर व आझाद वार्डातील अनेक कुटुंबे अनेक वर्षांपासून वास्तव्यास असतानाही त्यांना अद्याप कायमस्वरूपी मालकी हक्काचे पट्टे मिळालेले नाहीत. त्यामुळे नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ घेण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या सर्व पात्र रहिवाशांना कायमस्वरूपी पट्टे देऊन त्यांना कायदेशीर मालकी हक्क प्रदान करावा, अशीही प्रमुख मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी नगरसेवक इरफान खान पठाण यांनी प्रशासनाने नागरिकांच्या न्याय्य मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा नागरिकांच्या सहभागातून लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन उभारण्यात येईल, असा इशाराही दिला.

मुख्याधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारून संबंधित मागण्यांवर नियमानुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

निवेदन सादर करताना नगरसेवक इरफान खान पठाण यांच्यासह इंदिरा नगर व आझाद वार्डातील नागरिक, महिला, युवक तसेच स्थानिक रहिवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परिसरातील विकासकामे, घरकुल योजना आणि कायमस्वरूपी पट्ट्यांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्याची एकमुखी मागणी उपस्थित नागरिकांनी यावेळी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!