धक्कादायक..! वडिलांचाच दोन मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला
चंद्रपूर : दुर्गापूर येथील शक्तीनगर कॉलनी परिसरात सोमवारी रात्री उशिरा घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण चंद्रपूर शहर हादरले आहे. वडिलांनीच आपल्या दोन मुलांवर धारदार शस्त्राने कथित हल्ला केल्याची घटना समोर आली असून, या हल्ल्यात ७ वर्षीय देवांश बदखल याचा मृत्यू झाला, तर त्याचा ११ वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाला आहे. जखमी मुलावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी वडील मंगेश बदखल याला अटक केली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगेश बदखल हा वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (WCL) चंद्रपूर क्षेत्रातील क्वार्टर क्रमांक एम-२९ येथे आपला भाऊ राहुल बदखल आणि दोन मुलांसह राहत होता. काही महिन्यांपूर्वी कौटुंबिक वादातून त्याची पत्नी घर सोडून गेल्याची माहिती आहे. त्यानंतर मंगेश हा ऑटो-रिक्षा चालवून आपल्या दोन्ही मुलांचा सांभाळ करीत होता.
पत्नीला पुन्हा घरी आणण्यासाठी तो वारंवार प्रयत्न करीत होता. मात्र, त्याला यश आले नसल्याने तो मानसिक तणावाखाली असल्याचे सांगितले जात आहे. तथापि, मुलांवर करण्यात आलेल्या कथित जीवघेण्या हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
सोमवारी रात्री उशिरा दोन्ही मुलांवर धारदार शस्त्राने हल्ला झाल्याची माहिती समोर आली. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. जखमी मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी देवांश बदखल याला मृत घोषित केले, तर त्याच्या मोठ्या भावावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले तसेच दुर्गापूर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून आरोपी मंगेश बदखल याला ताब्यात घेत अटक केली आहे.
दरम्यान, स्वतःच्या मुलांवरच वडिलांनी कथित हल्ला केल्याची माहिती समोर आल्यानंतर शक्तीनगर परिसरात संताप आणि हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमागील नेमके कारण काय, हल्ला कोणत्या परिस्थितीत झाला आणि घटनेत आणखी काही बाबींचा संबंध आहे का, याचा तपास दुर्गापूर पोलीस करीत आहेत.
या हृदयद्रावक घटनेमुळे दोन निष्पाप मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पोलिसांच्या तपासानंतरच या प्रकरणामागील संपूर्ण सत्य समोर येणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!