"तलावालगत धोकादायक मीना बाजार; NOCशिवाय धाडसी सुरुवात!"
"तलावालगत धोकादायक मीना बाजार; NOC शिवाय धाडसी सुरुवात!"
मूल : शहराच्या प्रवेशद्वारावर, तलावाच्या शेजारी आणि मातीचा भरण टाकलेल्या सरकारी जागेवर, कुणाच्याही परवानगीशिवाय मीना बाजाराचे काम सुरू झाल्याने मूलच्या प्रशासकीय वर्तुळात आरोप—प्रत्यारोपांना ऊत आला आहे. विशेष म्हणजे, ही जागा सिंचाई विभागाच्या मालकीची असून, अद्याप कोणत्याही संबंधित विभागाने यासाठी नाहरकत प्रमाणपत्र (NOC) दिलेले नाही.
ही जागा जुन्या रेल्वे लाईनला लागून आहे. एका बाजूला तलाव व दुसऱ्या बाजूला खोलगट पाणथळ भाग होता. याच भागावर भरण टाकून ‘उद्यान निर्मिती’साठी मंजुरी तत्कालीन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यकाळात देण्यात आली होती. काही प्रमाणात काम झालेही होते, मात्र मुनगंटीवार यांचे मंत्रीपद जाताच प्रकल्प थांबला. आता, त्याच ठिकाणी मीना बाजार भरविण्याच्या हालचालींनी नागरिकांमध्ये आश्चर्य व संताप व्यक्त होत आहे.
नागरिकांची भिती — “आज मीना बाजार, उद्या कायमस्वरूपी व्यापारी उपयोग!”
जागा अजूनही दलदलीची आहे; भरण पक्का नाही. बाजूला तलाव असून कठळे नाहीत, सुरक्षेची साधने नाहीत, स्ट्रीटलाईट नाहीत. महामार्गालगत असल्याने वाहतूक कोंडी व अपघाताची शक्यता प्रचंड आहे. नागरिकांचा ठाम इशारा आहे, “आज परवानगीशिवाय मीना बाजार सुरू झाला, तर उद्या ही जागा कायमच्या बाजारासाठीच गमवावी लागेल.”
परवानगी प्रक्रियेचा फज्जा
नियमाप्रमाणे नगर परिषद, सिंचाई विभाग, महावितरण आणि पोलिस विभाग यांच्या नाहरकत प्रमाणपत्रांनंतर तहसीलदार परवानगी देतात. पण चौकशीत सर्व विभागांनी NOC नाकारल्याचे स्पष्ट झाले. तहसीलदार मृदुला मोरे यांनीही “आम्ही NOC दिली नाही” असे स्पष्ट सांगितले. तरीसुद्धा, मीना बाजार आयोजकांनी जेसीबी लावून जागा लेव्हल केली, पाळणे आणि साहित्य आणून ठेवले.
गंभीर प्रश्न — परवानगीशिवाय मीना बाजाराचे काम कुणाच्या छत्रछायेखाली सुरू आहे?
सिंचाई विभागाकडून आजवर कोणतीही कारवाई नाही, आणि नगर परिषदेच्या पूर्वपरवानगीशिवाय कोणतेही आयोजन करता येत नसतानाही, नगर परिषद मूल मात्र गाढ झोपेत असल्याची नागरिकांची टीका आहे.
सर्व प्रक्रिया चुकीचीच! मोती टहलियानी
यासंदर्भात प्रतिक्रिया देतांना, मीना बाजार संचालकाची ही मनमानी आहे. कोणतेही नाहरकत प्रमाणपत्र नसतांना थेट मीना बाजार सुरू करण्याची तयारी करणे, सामान टाकणे ही मुजोरी असल्याची टिका नपचे माजी उपाध्यक्ष मोती टहलियानी यांनी केली आहे. ही जागा मीना बाजार करीता चुकीची आणि धोकादायक असल्याची प्रतिक्रिया त्यानी पब्लिक पंचनामाशी बोलतांना दिली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!