चिमूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिकावरील कीड व रोग नियंत्रणाबाबत मार्गदर्शन

सावरी - प्रतिनिधी ( विनोद उमरे )

सावरी : - चिमूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन पिकावर कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. या गंभीर परिस्थितीचा आढावा घेऊन कृषी विभाग तसेच कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन केले.
    चिमूर तालुक्यातील  विविध गावांमध्ये प्रत्यक्ष शेतावर भेट देऊन शास्त्रज्ञांनी सततचा पाऊस आणि वातावरणातील दमटपणा यामुळे सोयाबीन पिकावर रोगांचा प्रादुर्भाव वाढत असून सतत पाऊस असल्यामुळे औषध फवारणी करण्यासाठी अडथळे येत असल्याबाबत किंवा फवारणी केली तरी योग्य परिणाम दिसून येत नसल्याबाबतचे निरीक्षण शास्त्रज्ञांनी नोंदविले.पांढरी माशी ही कीड या रोगांच्या प्रसारासाठी मुख्यतः कारणीभूत ठरत असून तिच्यामुळे झाडाची पाने पिवळसर होऊन पिकाची वाढ खुंटते तसेच विषाणूजन्य रोग झपाट्याने पसरत असून वेळीच उपाययोजना झाल्या नाहीत तर या परिस्थितीत वाढ होऊन उत्पन्नावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता कृषि विज्ञान केंद्र येथील शास्त्रज्ञ पथक यांनी   वर्तवली.
कृषि विज्ञान केंद्र सिंदेवाही येथील शास्त्रज्ञ पथकाने पुढीलप्रमाणे नियंत्रणासाठी शिफारसी दिल्या आहेत तसेच प्रादुर्भाव आटोक्यात आनण्यासाठी खालील उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले. 
(1) रोगग्रस्त झाडे काढून टाका – पिकामध्ये ज्या झाडांवर रोगाचे लक्षणे दिसतात ती झाडे त्वरित शेतातून काढून नष्ट करावीत. यामुळे निरोगी झाडांचे संरक्षण होईल.
(2) पिवळे चिकट सापळे लावा – शेतात प्रत्येकी ६४ सापळे प्रति हेक्टर प्रमाणे लावल्यास पांढऱ्या माशीची संख्या कमी करता येते.
(3) कीटकनाशकाची फवारणी – डायफेनथुरॉन २५% + पायरीप्रोकसीफेन ५% या संयुक्‍त कीटकनाशकाची ३० मिली प्रति पंप या प्रमाणात फवारणी करावी.
(4) पाण्याचा निचरा-
शक्य असेल तिथे साचलेले पाणी शेतातून बाहेर काढून द्यावे जेणेकरून झाडांच्या मुळाजवळ वाफसा निर्माण होईल.
 याप्रमाणे वेगवेगळ्या उपाय योजना करून कीड नियंत्रणासह रोगाचा प्रसार रोखता येईल.
             शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सोनाली लोखंडे आणि डॉ. स्नेहा वेलादी, तालुका कृषी अधिकारी चिमूर श्री.एस. पी. पुजारी,कृषी अधिकारी श्री. विलास शेंडे, मंडळ कृषी अधिकारी चिमूर श्री. रुपेश सोनवणे, उप कृषी अधिकारी कुमारी रेखा चव्हाण,सहायक कृषी अधिकारी श्री. बी. बी. येवले आणि कुमारी ऋतुजा तुरानकर उपस्थित होते.

वरील परिस्थिती तालुक्यात सगळीकडेच कमी जास्त प्रमाणात असल्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळेवर शिफारसींची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, पिकांवर सतत लक्ष ठेवून रोगाची लक्षणे दिसताच त्वरित उपाययोजना कराव्यात, असेही सांगण्यात आले. योग्य काळजी घेतल्यास सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टाळता येईल, असा विश्वास शास्त्रज्ञ तसेच तालुका कृषी अधिकारी यांनी व्यक्त  व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!