सावली तहसीलदारांना रेती वाटपाचा मुहूर्त सापडेना - - तारीख पे तारीख सुरु असल्याने घरकुलधारक चिंतेत
सावली - शासनाने घरकुल मंजूर केले परंतु बांधकासाठी लागणारी रेती मात्र प्रशासनाच्या अडेलतट्टू धोरणामुळे मिळत नसल्याने घरकुलांची कामे ठप्प पडली आहेत. यातच ५ मे पासून तहसीलदार सावली यांचेकडून तलाठी यांना रेती वाटप करण्याचे आदेश देण्यात आले असल्याने घरकुलधारकांना आनंद झालेला होता परंतु अंमलबजावणी झालीच नाही मात्र आता नवीनच वाहतूक भाडा ठरवणे व देखरेख करीता समन्वय समिती स्थापन करीत वेळकाढू धोरण तहसील प्रशासनाचे असल्याने रेती वाटपाचा शुभ मुहूर्त कधी येणार याकडे घरकुलधारकांचे लक्ष लागले आहेत.
तालुक्यात प्रधानमंत्री आवास, शबरी आवास, यशवंतराव चव्हाण आवास, रमाई आवास योजनेनंतर्गत हजारो घरकुल मिळाले, पण रेतीचे काय असा प्रश्न अनेक घरकुल लाभार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. रेतीच्या टंचाईमुळे अनेक लाभार्थ्यांनी घरकुलाचे काम सुरू केले नाही तर काहींनी अधिकच्या भावाने चोरीची रेती खरेदी करून बांधकाम सुरु केले मात्र तेही अर्धवट आहेत. घरकूल लाभार्थ्यांची ही समस्या लक्षात घेऊन लाभार्थी, लोकप्रतिनिधी व वृतपत्राच्या माध्यमातून रेतीची मागणी केली जात होती. शासनाने जुने धोरण बदलवत २०२४ मध्ये नवीन रेती धोरण जाहीर केले. त्यानुसार घरकुल लाभार्थ्यांना ५ ब्रास मोफत रेती देण्यात येणार आहे. सावली तालुका प्रशासन प्रमुख तहसीलदार प्रांजली चिरडे यांनी तलाठी यांना ३० एप्रिलच्या पत्रात ५ मे पासून स्वतः रेती घाटावर उपस्थित राहून रेती वाटप करण्याचे आदेश दिले होते. यामुळे घरकुल बांधकामाचा प्रश्न काही प्रमाणात सुटेल अशी आशा घरकुलधारकांमध्ये निर्माण झाली. वाटपाचा मुहूर्त जात असतांनाही प्रशासनाकडून काहीच हालचाली होत नसल्याने लाभार्थी महसूल प्रशासनाच्या दरबारी रेतीसाठी येऊ लागले पण अंमलबजावणी शून्य असल्याने रेतीचे वाटप झालेच नाही.
आता समन्वय समिती करणार रेतीचे वाटप...
नव्यानेच ७ मे ला तहसीलदार सावली यांनी आदेश देत समन्वय समितीच्या देखरेखीत रेती वाटप करण्यास सांगितले आहे. समितीत तलाठी अध्यक्ष असून सदस्य म्हणून पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व समिती सचिव ग्रामसेवक असतील. समितीने गावापासून ते घाटापर्यंत ट्रॅक्टर वाहतूक दर, मजूर खर्च हे ठरवून ट्रॅक्टर नंबरसहित माहिती मागितली आहे पण किती दिवसात माहिती द्यावी याची कालमर्यादा नसल्याने वेळकाढू धोरण असल्याचे दिसते. काही दिवसातच पावसाळा सुरु होण्याचे संकेत असतांना रेती वाटप कधी होणार याकडे लक्ष लागले आहे. एकंदरीत रेती वाटपाचा शुभ मुहूर्त निघणार की नाही अशी चर्चा आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!