जानाळा ग्रामसभेतील महिलांचा सामूहिक वनहक्क व्यवस्थापनातील पुढाकार: एक प्रेरणादायी उदाहरण
चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील ताडोबा जंगल क्षेत्रातील वनहक्क प्राप्त गाव जानाळा येथे वनहक्क व्यवस्थापनाच्या क्षेत्रात महिलांनी घेतलेला पुढाकार विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागात खूप महत्त्वाचा ठरतो आहे. या संदर्भात जानाळा ग्रामसभेतील महिलांचे नेतृत्व एक अद्वितीय आणि प्रेरणादायी उदाहरण आहे. जानाळा गावाला सामूहिक वनहक्क कायद्यांतर्गत १३४.०८ हेक्टरचे वनक्षेत्र गावकऱ्यांना प्राप्त झाले आहे. या वनक्षेत्राचे शाश्वत व्यवस्थापन आणि संवर्धन करण्यासाठी ग्रामसभेतील महिलांनी पुढाकार घेतला आहे.
महिलांचे नेतृत्व आणि व्यवस्थापन
ग्रामसभा जानाळाच्या वनहक्क व्यवस्थापन समितीत महिलांचे प्रतिनिधित्व हा विशेष मुद्दा आहे. शासन निर्णयानुसार वनहक्क व्यवस्थापन समितीत एक महिला पदाधिकारी असणे बंधनकारक आहे आणि एकतृतीयांश जागा महिलांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत. परंतु, जानाळा ग्रामसभेत हा नियम फक्त कागदावरच नसून महिलांनी व्यवस्थापनात आघाडी घेतली आहे. समितीत अध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष अशा महत्त्वाच्या पदांवर महिलांचे प्रतिनिधित्व आहे. या समितीचे कार्य व्यवस्थित आणि नियोजनबद्धपणे चालवले जात आहे.
महिलांनी ग्रामसभेमध्ये केवळ व्यवस्थापनाची जबाबदारी घेतली नाही, तर वनक्षेत्राचा पुनरुत्थान आराखडा तयार करून त्याची अंमलबजावणी करण्याचे महत्त्वपूर्ण कामही त्यांनी करत आहे. व्यवस्थापन आराखड्याचा भाग म्हणून, त्यांनी वनक्षेत्रातील पुनर्रचना, संवर्धन, आणि शाश्वत उपजीविकेच्या संधी निर्माण करण्याच्या उपाययोजना केल्या आहेत. या प्रक्रियेत महिलांनी शिवार फेरी करून वनसंपत्तीचा सर्वेक्षण केला आणि वनक्षेत्राचे शाश्वत व्यवस्थापन आराखडा तयार करण्यासाठी केला आहे.
रोजगार निर्मिती आणि आर्थिक व्यवहार
वनहक्काच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे जानाळा गावातील महिलांनी केवळ वनसंपत्तीचे संवर्धनच नाही, तर रोजगाराच्या संधीही निर्माण व्हाव्या या जंगलातील संसाधने जसे की बांबू, फळझाडे, आणि इतर वनसंपत्तीचा शाश्वत वापर करून उत्पन्नाच्या विविध स्रोतांची निर्मिती व्हावी यासाठी सतत प्रयत्न करित असून भविष्यात गावातीच स्थिर रोजगार मिळावा यासाठी महिला पुढाकार घेत आहे.
महिलांनी समितीच्या बँक खात्याचे व्यवस्थापन सांभाळले आहे आणि आर्थिक व्यवहारांवर देखरेख ठेवली आहे. महिलांच्या या कार्यक्षमतेमुळे गावात शाश्वत विकासाचे एक नवे मॉडेल तयार झाले आहे. गावात विविध सूचना आणि माहिती फलक लावून ग्रामस्थांना वनहक्क आणि त्याच्या व्यवस्थापनाविषयी जागरूक केले करत आहे.
तालुका कन्वर्जन समितीमध्ये महिला प्रतिनिधी
या यशस्वी व्यवस्थापनामुळे यमुना परचाके यांची तालुका कन्वर्जन समितीत निवड झाली आहे. तालुका कन्वर्जन समितीमध्ये महिलांचे प्रतिनिधित्व असणे खूप महत्त्वाचे आहे कारण त्याद्वारे महिलांना निर्णय प्रक्रियेत अधिक सक्रियपणे सहभागी होता येते.
जानाळा ग्रामसभेतील महिलांनी घेतलेल्या पुढाकारामुळे जंगल संरक्षण आणि व्यवस्थापनात महिलांचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागात महिलांचा सहभाग अशा प्रकारे वाढत असेल, तर या प्रक्रिया खऱ्या अर्थाने प्रभावी ठरतात. त्यांचे नेतृत्व आणि सहभागाने संपूर्ण समाजासाठी एक आदर्श निर्माण केला आहे, ज्यामुळे इतर ग्रामसभांना एक दिशा मिळाली आहे.
या महिला दिनानिमित्त, जानाळा ग्रामसभेतील महिलांनी उभे केलेले हे प्रेरणादायी उदाहरण सगळ्यांसमोर मांडताना खूप अभिमान वाटतो. या उपक्रमाने महिलांच्या सक्षमीकरणाचा, जंगल संवर्धनाचा, आणि शाश्वत विकासाचा मार्ग मोकळा केला आहे. ग्रामीण भागातील महिलांचा या प्रक्रियेत असलेला सहभाग आणि त्यांची नेतृत्व क्षमता संपूर्ण समाजाला प्रोत्साहन देणारी आहे...
✍️ लेखक: नितीन ठाकरे, टाटा सामाजिक विज्ञान संस्थान, मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!