दांडी बहाद्दर गुरुजी निलंबित -पब्लिक पंचनामा बातमीचा दणका

अखेर दांडी बहाद्दर गुरुजी निलंबित - सीईओ विवेक जॉन्सन यांची कारवाई 
पब्लिक पंचनामा बातमीचा दणका 



सावली - (विजय कोरेवार) 
राजोली चक क्र. 2 (फाल) येथील जिल्हा परीषद शाळेचे मुख्याध्यापक मिलिंद चांदेकर हे शाळेत नियमित उपस्थित न राहता दांडी मारत असल्याची तक्रार अनेकदा करूनही काहीच कारवाई होत नसल्याने "दांडीबहाद्दर गुरुजीला सीईओचे अभय - कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत धूळखात" या मथळ्याखाली पब्लिक पंचनामा पोर्टलवर बातमी प्रकाशित केली होती. या बातमीची दखल घेत जिल्हा परीषद मुख्यकार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी दखल घेत निलंबनाची कारवाई केली.
      सावली तालुक्यातील राजोली चक क्र. 2 (राजोली फाल) येथे इयत्ता 1 ते 4 असून मुख्यद्यापक मिलिंद चांदेकर हे नियमित गैरहजर राहतात, शाळेत आले तरी फोनवर इतर व्यवसायाच्या गोष्टी  बोलत असतात, मध्येच शाळेच्या वेळेत कधीही निघून जातात, गैरहजर दिवशीचीही हजेरी मस्टरवर लावतात. अशा तक्रारी पालकांनी व चिचबोडीचे सरपंच सतीश नंदगिरवार यांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यानुसार  गटशिक्षणाधिकारी लोकेश खंडारे यांनी पालकांचे बयान व रेकॉर्डची चौकशी करून कारवाईचा प्रस्ताव जिल्हा परिषदला पाठवला. मात्र याकडे शिक्षणाधिकारी, मुख्यकार्यकारी अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याची बातमी पब्लिक पंचनामा पोर्टलवर प्रकाशित करण्यात येऊन जिल्हा परीषद प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.  त्यामुळे या बातमीची दखल घेत वारंवार रजेवर जाणे, शाळेत गेल्यावरही पूर्णवेळ हजर न राहणे, पालकांशी अरेरावी वागणे, आर्थिक व्यवहार धनादेशाने न करता रोखीने करणे, कॅशबुक अद्यावत न ठेवणे या बाबी गटशिक्षणाधिकारी लोकेश खंडारे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आढळल्याने कसूरवार ठरवले होते. याच चौकशीनुसार  कसूरवार ठरवीत जिल्हा परीषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम 1964 चे नियम 3 (1)(अ) मधील तरतुदीनुसार निलंबित केले. या कारवाईमुळे जिल्हा परीषद अंतर्गत कामचुकार अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.
गावकऱ्यांनी पब्लिक पंचनामाचे आभार मानले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!