सिंदेवाही वनपरिक्षेत्रात बिबट मादी मृतावस्थेत आढळली; दोन वन्यप्राण्यांच्या झुंजीत मृत्यू झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष



सिंदेवाही, दि. १३ ऑगस्ट २०२६ : सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील उपक्षेत्र नवरगाव, नियतक्षेत्र नवरगाव-१ अंतर्गत कक्ष क्रमांक २३४/५७६ (RF) मध्ये आज (दि. १३.०८.२०२६) एक बिबट (मादी) मृतावस्थेत आढळून आल्याची माहिती वनरक्षक कु. पी. एस. चौधरी व क्षेत्र सहाय्यक श्री. आर. आर. सिडाम यांनी भ्रमणध्वनीद्वारे वनपरिक्षेत्र अधिकारी अंजली सायंकार (बोरावार) यांना दिली.
माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी अधिनस्त वनकर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. घटनास्थळी अंदाजे २ वर्षे वयाची बिबट मादी मृतावस्थेत आढळून आली. याबाबतची माहिती तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली.
त्यानंतर मा. डॉ. कुमारस्वामी एस. आर. (उपवनसंरक्षक, ब्रम्हपुरी वनविभाग), मा. अरविंद जे. (सहायक वनसंरक्षक – प्रादेशिक व वन्यजीव), मानद वन्यजीव रक्षक श्री. अमोद गौरकार, श्री. शितलकुमार गुरुदास भांडारकर (तरुण पर्यावरणवादी मंडळ, शंकरपूर), श्री. जिवेश सयाम (स्वॉब नेचर फाउंडेशन, तळोधी), श्री. राकेश अहुजा (बायोलॉजिस्ट, ब्रम्हपुरी वनविभाग) तसेच पंच यांच्या उपस्थितीत घटनास्थळाचा मौका पंचनामा करण्यात आला.
यानंतर मृत बिबट्याचे शव मध्यवर्ती काष्ठ भांडार, सिंदेवाही येथे आणण्यात आले. तेथे डॉ. विनोद पत्रुजी जांभुळे (पशुवैद्यकीय अधिकारी, वासेरा) यांच्या उपस्थितीत शवविच्छेदन करण्यात आले. तपासणीदरम्यान बिबट्याचे सर्व अवयव शाबूत असल्याची खात्री करण्यात आली.
पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या प्राथमिक अहवालानुसार, सदर बिबट मादीचा मृत्यू दोन वन्यप्राण्यांमधील झुंजीत झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी संबंधित वनरक्षक यांनी वनगुन्हा नोंदविला असून, सर्व अधिकारी, वनकर्मचारी व पंच यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती काष्ठ भांडार, सिंदेवाही येथे मृत बिबट्याचे सर्व अवयव नियमानुसार पूर्णपणे जाळून नष्ट करण्यात आले. याबाबतचा दहन पंचनामाही नोंदविण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!