गोरगरीब जनता, सर्वसामान्य शेतकरी आणि समाजातील वंचितांची निस्वार्थपणे सेवा करणारे आदर्श तहसीलदार डॉक्टर रवींद्र होळी

राजुरा तालुक्यातील एका युवा शेतकऱ्याचे मनोगत

राजुरा तालुका - प्रतिनिधी ( रोशन येवले )

राजुरा : - आजच्या युगात काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी तर काही पैसा कमवण्यासाठी जगतात. तर काही अशा व्यक्ती आहे की, ज्या इतरांसाठी निस्वार्थपणे काम करतात, झटतात आणि समाजासाठी आदर्श व प्रेरणादायी ठरतात. असेच एक व्यक्तिमत्त्व म्हणजे राजुराचे तहसीलदार माननीय डॉक्टर रवींद्र होळी साहेब. तहसीलदार होळी साहेब यांच्याविषयी बोलायचे झाल्यास मी तर असे म्हणेन की, मी माझ्या आयुष्यात सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी जीव ओतून काम करणारे मि पाहिलेले पहिले तहसीलदार  होय. कारण मला आलेल्या अनुभवातून मी हे ठामपणे आणि तितक्याच नम्रतेने आपल्याला सांगू इच्छितो. मी माझ्या शेतीचे आपसी वाटणीपत्र करण्याकरता जेव्हा अटरणी, तलाठी, तहसीलदार यांच्याकडे गेलो. तेव्हा प्रत्येकाने वेगवेगळा सल्ला दिला आणि त्यासाठी लागणारा खर्च सुद्धा सांगीतला. परंतु खर्चाची रक्कम ऐकून मी सुन्न झालो. कारण ती रक्कम ६० ते ७० हजार रुपयांच्या वरची होते. त्यामुळे काही काळ मी तसाच थांबलो यामध्ये दोन ते तीन महिन्याचा काळ निघून गेला. तोपर्यंत डॉक्टर रवींद्र होळी साहेब राजुरा चे तहसीलदार म्हणून रुजू झाले होते.  मी आणि माझे काही मित्र तहसीलदार साहेबांना भेटलो आणि माझ्या कामाबद्दल सांगितले. तेव्हा तहसीलदार साहेब मला म्हणाले की, हो तुमचे काम निश्चितच होऊन जाईल. कारण तो तुमचा कायदेशीर हक्क आहे. तेव्हा मला खूप बरे वाटले आणि माझे काम नक्की होईलच याचा विश्वास सुद्धा. त्यानंतर मी कामाला लागलो. कागदपत्र व इतर खर्च मिळून मला केवळ एक हजार रुपये लागले आणि लवकरच माझा प्रश्न निकाली सुद्धा लागला. माझ्या गावात माझ्यासारख्या अनेक शेतकऱ्यांचे सुद्धा असेच काम होते. तेव्हा मी आणि काही माझ्या मित्रांनी मिळून तहसीलदार साहेबांना विनंती केली की, साहेब आमच्या गावात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत.
 मग ते वाटणीपत्र ची असो, राशन कार्ड ची असो कि हक्कसोड पत्राचे. तेही तेही प्रश्न आपण सोडवण्यास पुढाकार घेतल्यास बरे राहील. तेव्हा तहसीलदार साहेबांनी कसलाही विलंब न करता आम्ही तुमच्या गावात महसूल विभागामार्फत कॅम्प घेऊन असे  सगळे प्रश्न मार्गी लावूयात असे सांगीतले. तेव्हा आम्ही मित्रांनी मिळून आमच्या टेंबूरवाही  या गावात महसूल विभागाच्या कॅम्पचे आयोजन केले. ज्यामध्ये हजारो शेतकऱ्यांचे गावातील सर्वसामान्य लोकांचे शेकडो काम एकही रुपया खर्च न करता गावातल्या गावात झाली. जी कामे करायला गावातल्या माणसाला तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. त्यासाठी हजारो रुपयांचा खर्च करावा लागतो. तीच कामे आपल्या गावात एकही रुपया खर्च न करता झाली. इतकेच नव्हे मी जेव्हा जेव्हा तहसीलदार साहेबांकडे   माझे व इतर शेतकऱ्यांचे कामे घेऊन गेलो, तेव्हा तेव्हा त्यांनी अत्यंत फास्ट पणे आमची कामे केली. वर्षानुवर्षे रखडलेल्या शिव धुळ्याचे काम असो, एखाद्या शेतमजुरांचे. तहसीलदार साहेबांनी चुटकीसरशी सर्व काम करून आम्हा शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. खरतर सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी देव माणूस आहेत ते. आज त्यांची बदली झाल्याची बातमी ऐकून मनाला खूप दुःख वाटले. कारण आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब जनतेसाठी इतक्या तळमळीने काम करणारा अधिकारी मी यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. ते बदलून कुठेही गेले तरी त्यांच्याबद्दलचे स्थान आमच्या मनात सदैव कायम राहील. साहेब तुमच्या भावी वाटचालीस, कामास समस्त शेतकऱ्यांकडून मनःपूर्वक शुभेच्छा. साहेब आपण जिथे जाल तिथे सुद्धा शेतकरी व गोरगरीब जनतेची निस्वार्थपणे सेवा कराल, यासाठी आपल्याला दीर्घ आयुष्य लाभो, अशी सदिच्छा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो.

अरविंद वांढरे
युवा शेतकरी टेंभुरवाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!