पुरस्कृत शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेणार!

शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांचे आश्वासन; मंत्रालयात लवकरच विशेष बैठक

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.०३/१०/२०२६ राष्ट्रीय/राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षक असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने पुरस्कृत शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात सोमवार,दि.२ नोव्हेंबर रोजी नागपूर येथील राजवाडा पॅलेस येथे राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांना निवेदन देण्यात आले.शिक्षकांच्या न्याय्य मागण्यांवर सविस्तर चर्चा करून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात येईल,असे आश्वासन राज्यमंत्री डॉ.भोयर यांनी यावेळी दिले.

राष्ट्रीय व राज्य स्तरावर शासनाकडून पुरस्कारप्राप्त शिक्षकांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले असून, त्यांच्या कार्याचा सन्मान आणि प्रोत्साहन कायम राहावे,या उद्देशाने असोसिएशनच्या वतीने विविध मागण्या मांडण्यात आल्या.

यामध्ये राष्ट्रीय व राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षकांना कायमस्वरूपी ओळखपत्र देण्यात यावे,विविध शासकीय समित्यांवर सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात यावी,दि.४ सप्टेंबर २०१४ चा शासन निर्णय तसेच दि.२४ ऑगस्ट २०१७ रोजीचे सामान्य प्रशासन विभागाचे आदेश रद्द करण्यात यावेत,राष्ट्रीय व राज्य पुरस्कारप्राप्त शिक्षकांना दोन नियमित वेतनवाढी पुन्हा सुरू करण्यात याव्यात, तसेच सन २०१८ पासून बंद करण्यात आलेल्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांच्या वेतनवाढी पूर्ववत सुरू करण्यात याव्यात,अशा महत्त्वपूर्ण मागण्यांचा समावेश होता.

या सर्व मागण्यांवर राज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली.संबंधित विषयांवर तातडीने निर्णय घेण्याच्या दृष्टीने मुंबई येथील मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात येईल,असेही त्यांनी स्पष्ट केले.त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांच्या पूर्ततेबाबत शिक्षकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

याप्रसंगी राष्ट्रीय/राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षक असोसिएशन राज्याध्यक्ष डॉ.प्रदीप बिबटे,सरचिटणीस बळीराम चापले,कार्याध्यक्ष जगन्नाथ पोटे,कोषाध्यक्ष सुनील नायक, विभागीय अध्यक्ष ओमप्रकाश गायधने,जिल्हा संघटक मेघश्याम जंजाळ,राज्य उपाध्यक्ष गजानन कुरवाडे,डॉ.शारदा रोशनखेडे, राज्य सहसचिव डॉ.चित्रा मजूमदार,सौ.विजया कोकमवार, खुशाल डोंगरवार,शेषराव घाटोळ, सौ.रंजना सोरमारे,राज्य कार्यकारिणी सदस्य रामप्रसाद मस्के,पक्षभान ढोक यांच्यासह विदर्भातील मोठ्या संख्येने राष्ट्रीय व राज्य पुरस्कृत आदर्श शिक्षक उपस्थित होते.

पुरस्कृत शिक्षकांच्या सन्मान, प्रतिष्ठा आणि प्रलंबित हक्कांसाठी संघटना सातत्याने पाठपुरावा करणार असून,शासनाने या मागण्यांवर लवकरात लवकर ठोस निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!