राज्यस्तरीय आयडॉल शिक्षकांच्या यादीत गोपाळ गुडधे यांचा गौरव

लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार अभ्यास केंद्रात विद्यार्थ्यांना देतात मोफत स्पोकन इंग्लिशचे धडे

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - महाराष्ट्र राज्यातील आयडॉल शिक्षकांची यादी जाहीर झाली असून, त्यामध्ये चिमूर तालुक्यातील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, बोथली येथील उपक्रमशील शिक्षक गोपाळ भाऊराव गुडधे यांचा समावेश झाला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्र, वरोरा येथे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

गोपाळ गुडधे हे शैक्षणिक क्षेत्रात विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे शिक्षक म्हणून परिचित आहेत. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास, इंग्रजी भाषेतील संवादकौशल्य आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात. विशेष म्हणजे, वरोरा येथील लोकनेते सुधीरभाऊ मुनगंटीवार सामूहिक अभ्यास केंद्रात ते विद्यार्थ्यांना स्पोकन इंग्लिशचे मोफत धडे देत आहेत. आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांनाही इंग्रजी संभाषणाचे कौशल्य आत्मसात करता यावे, या उद्देशाने ते सामाजिक बांधिलकीतून हे अध्यापनकार्य करीत आहेत.

त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक योगदानाची दखल घेत महाराष्ट्र राज्यातील आयडॉल शिक्षकांच्या यादीत त्यांना स्थान मिळाले आहे. ही बाब अभ्यास केंद्रासाठी तसेच परिसरातील शैक्षणिक क्षेत्रासाठी अभिमानास्पद ठरली आहे.

याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष संजय दानव आणि सचिव आशिष घुमे यांनी गोपाळ गुडधे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. त्यांच्या शैक्षणिक कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!