पाटबंधारे विभागाच्या मामा तलावातून दिवसाढवळ्या मुरमाचे अवैध उत्खनन;

 

घोडाझरी अभयारण्यालगत प्रकार; महसूल, वनविभाग व पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष; अवैध काम थांबवून पंचनामा


तळोधी (बा.) प्रतिनिधी 

    घोडाझरी अभयारण्याला लागून असलेल्या व पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या प्रसिद्ध चिंधीमाल मामा तलावातून गेल्या तीन-चार दिवसांपासून दिवसाढवळ्या पोकलँड आणि टिप्परच्या साह्याने मुरमाचे अवैध उत्खनन सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. विनापरवाना व रॉयल्टीची पावती न घेता शेकडो ब्रास मुरूम उपसला जात असून, शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवला जात आहे. या प्रकारावर संबंधित महसूल, वनविभाग व पाटबंधारे विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प असल्याने नागरिक संतप्त व्यक्त करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, चिंधीमाल मामा तलाव हा घोडाझरी अभयारण्याच्या बफर झोनलगत आहे. या तलावाच्या पाण्याचा उपयोग चिंधीमाल, चिंधीचक, ओवळा, पळसगाव आणि जणकापूर येथील शेतकऱ्यांना सिंचनासाठी होतो. या वर्षी पाणीटंचाईमुळे तलावात जलसाठा कमी आहे. तसेच अभयारण्याला लागून असल्याने वन्यजीवांचा या ठिकाणी पाण्यासाठी मोठा राबता असतो.

असे असतानाही, गेल्या ३-४ दिवसांपासून पोकलँड मशीन व टिप्पर लावून या तलावातून विनापरवाना शेकडो ब्रास मुरमाचे अवैध उत्खनन केले जात आहे. हा काढलेला मुरूम नागभीड-तळोधी मार्गावरील घोडाझरी गेटसमोरील रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरू असलेल्या शासकीय कामावर टाकला जात आहे. इतका मोठा प्रकार सुरू असतानाही महसूल विभागाने याकडे पूर्णपणे कानाडोळा केल्याचा आरोप स्थानिक जनतेकडून होत आहे.

पाटबंधारे विभागाकडून मोक्का चौकशी व काम बंद

या अवैध उत्खननाबाबत पाटबंधारे विभागाची कोणतीही परवानगी नव्हती, तसेच जिल्हा खनिकर्म विभागाची रॉयल्टी पावतीही नव्हती. आज सकाळी हे उत्खनन सुरू असताना सिंचन विभागाचे अधिकारी मदनकर व मडावी यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यांनी तातडीने चालू असलेले काम थांबवून जागेची मोक्का चौकशी केली व पंचनामा केला.

कडक कारवाईची मागणी

या अवैध उत्खननामुळे शासनाचा मोठा महसूल बुडत असून वन्यजीवांच्या अधिवासालाही धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उत्खनन करणाऱ्या संबंधित कंपनीसह या कामात वापरण्यात आलेले पोकलँड मशीन आणि टिप्पर जप्त करून संबंधितांवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी परिसरातील जनतेकडून केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!