जागतिक अंडा दिनानिमित्त निष्टी शाळेत विद्यार्थ्यांना अंडा-बिर्याणीचे वाटप!
पशु चिकित्सालय, आमगावच्या वतीने १५० अंड्यांची भेट; विद्यार्थ्यांनी घेतला मध्यान्ह भोजनाचा आनंद
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - तालुक्यातील निष्टी येथील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत शुक्रवार, दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी जागतिक अंडा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने पशु चिकित्सालय, आमगाव यांच्या वतीने आयोजित पशुशिबिराच्या पार्श्वभूमीवर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १५० अंडी भेट देण्यात आली. या अंड्यांपासून तयार करण्यात आलेल्या अंडा-बिर्याणीचा विद्यार्थ्यांनी मध्यान्ह भोजनात आनंदाने आस्वाद घेतला.
जागतिक अंडा दिनाचे औचित्य साधून पशु चिकित्सालय, आमगाव यांच्या वतीने निष्टी येथे पशुशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैद्य, मेंढे, पिल्लेवान आणि अमोल कोलते उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अंड्यांचे महत्त्व आणि पोषणमूल्यांविषयी जागरूकता निर्माण करण्याचा संदेश देण्यात आला.
पशु चिकित्सालयाच्या पथकाने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १५० अंडी भेट दिल्यानंतर त्यापासून अंडा-बिर्याणी तयार करण्यात आली. हि बिर्याणी विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात देण्यात आली. पौष्टिक आहाराच्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक अंकुश कामडी यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अंडी उपलब्ध करून दिल्याबद्दल पशु चिकित्सालय, आमगावच्या पथकाचे आभार मानले.
या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक श्रीकृष्ण हाडगे, बावनगडे, शिक्षिका लीना काटेखाये, शिक्षणसेविका अर्चना आरसोडे आणि रुपाली वांढरे उपस्थित होते.
पौष्टिक आहाराचे महत्त्व अधोरेखित करणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये सकस आहाराबाबत जागरूकता निर्माण होण्यास मदत होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!