सावित्रीबाई फुले विद्यालयात विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन
बालकांचे संरक्षण,लैंगिक छळ आणि स्वसंरक्षणाच्या कायद्यांविषयी जनजागृती
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.२९/१०/२०२६
तालुका विधी सेवा प्राधिकरण, भंडारा तथा विधी सेवा समिती, दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर, पवनी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक सावित्रीबाई फुले विद्यालय,पवनी येथे दि.२८ ऑक्टो.रोजी दु.१ वा. कायदेविषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जागरुकता निर्माण करणे, बालकांचे कायदेशीर हक्क समजावून सांगणे आणि अन्यायाविरुद्ध स्वसंरक्षणासाठी कायद्याची माहिती देणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश होता.
कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून विधी सेवा समिती,पवनी येथील विधी सेवा स्वयंसेवक फाल्गुनी भुरे,तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये उपस्थित होत्या.उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.त्यानंतर कार्यशाळेला सुरुवात झाली.
यावेळी फाल्गुनी भुरे यांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण अधिनियम (POCSO), २०१२,भारतीय शस्त्र अधिनियम, १९५९ तसेच भारतीय न्याय संहिता,२०२३ यांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.लैंगिक छळ, अश्लील शब्दांचा वापर,पाठलाग करणे,चोरून पाहणे,मोबाईल हॅकिंग यांसारख्या गैरकृत्यांपासून विद्यार्थ्यांनी स्वतःचे संरक्षण कसे करावे,तसेच अशा प्रसंगी कायदेशीर मदत कशी घ्यावी, याबाबत त्यांनी माहिती दिली. कायद्याने दिलेले अधिकार, गुन्ह्यांचे स्वरूप आणि अन्यायाविरुद्ध निर्भयपणे आवाज उठविण्याचे महत्त्वही त्यांनी विशद केले.
मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांनी आपल्या मार्गदर्शनात, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी कायद्याची माहिती आणि त्याची योग्य समज असणे आवश्यक आहे,असे प्रतिपादन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या हक्कांविषयी जागरूक राहावे,कोणत्याही अनुचित प्रकाराकडे दुर्लक्ष न करता शिक्षक,पालक किंवा संबंधित यंत्रणेची मदत घ्यावी,असे आव्हानही त्यांनी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक अशोक गिरी यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वितेसाठी संदीप मुंडले,ललिता डेकाटे, अरुणा कांबळे,अर्चना दडवे, स्मिता मोहरकर,सुमय्या शेख तसेच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.विद्यार्थ्यांसाठी ही कार्यशाळा कायदेविषयक जाणीव आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने मार्गदर्शक ठरली.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!