कर्णकर्कश डीजेला फाटा; पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन!
भिसी पोलिसांकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी बाल गणेश मंडळ व उत्साही बाल गणेश मंडळाचा शाल, श्रीफळ देऊन गौरव
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील भिसी अप्पर तहसील याठिकाणी सण-उत्सव म्हटले की डीजेचा कर्णकर्कश आवाज, मोठ्या ध्वनिक्षेपकांचा गोंगाट आणि ध्वनिप्रदूषण हे चित्र अलीकडच्या काळात सर्वत्र पाहायला मिळते. मात्र, या प्रचलित पद्धतीला फाटा देत पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक काढून भिसी येथील दोन गणेश मंडळांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक करत भिसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिलीप पोटभरे यांनी दोन्ही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान केला.
दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी भिसी येथील धनगर मोहल्ल्यातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी बाल गणेश मंडळ आणि ठोंबरे मोहल्ल्यातील उत्साही बाल गणेश मंडळाने म्हस्कऱ्या गणेशाच्या विसर्जनानिमित्त पारंपरिक वाद्यांच्या साथीने मिरवणूक काढली. या मिरवणुकीत डीजेचा कर्णकर्कश आवाज टाळून बँड, ताशा, ढोल तसेच वारकरी संप्रदायाच्या भजन मंडळाला प्राधान्य देण्यात आले.
आजच्या डिजिटल युगात धार्मिक कार्यक्रम, लग्नसमारंभ आणि विविध उत्सवांमध्ये डीजेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, अशा मोठ्या आवाजामुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींना त्रास सहन करावा लागतो. याशिवाय ध्वनिप्रदूषणाचाही प्रश्न निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर दोन्ही गणेश मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातून उत्सव साजरा करण्याचा घेतलेला निर्णय विशेष कौतुकास्पद ठरला.
बाजार चौकात पोलिसांकडून मंडळांचा गौरव
दोन्ही मंडळांच्या विसर्जन मिरवणुका भिसी येथील बाजार चौकात पोहोचताच भिसी पोलीस ठाण्याच्या वतीने मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष अक्षय रमेश खवस आणि उत्साही बाल गणेश मंडळाचे अध्यक्ष चेतन विजय मदनकर यांच्यासह दोन्ही मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना ठाणेदार दिलीप पोटभरे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यावेळी ठाणेदार पोटभरे यांनी दोन्ही मंडळांच्या उपक्रमाचे कौतुक केले. पारंपरिक वाद्यांच्या माध्यमातूनही उत्सव मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करता येतो, हे या मंडळांनी दाखवून दिले आहे. उत्सव साजरा करताना ध्वनिप्रदूषण टाळण्याबरोबरच सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
पारंपरिक संस्कृती जपण्याचा सकारात्मक संदेश
गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून सामाजिक एकोपा, संस्कृती आणि परंपरा जपण्याचे माध्यम आहे. ढोल-ताशांचा निनाद, बँडची साथ आणि वारकरी संप्रदायाच्या भजनातून भक्तिमय वातावरण निर्माण करून उत्सव साजरा करता येतो, हे भिसीतील दोन्ही मंडळांनी दाखवून दिले.
डीजेच्या मोठ्या आवाजाला पर्याय म्हणून पारंपरिक वाद्यांचा स्वीकार केल्यास उत्सवाचा आनंद टिकवून ध्वनिप्रदूषण कमी करण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे या दोन्ही मंडळांचा उपक्रम इतर गणेश मंडळांसाठीही प्रेरणादायी ठरणारा आहे.
सर्व मंडळांनी पारंपरिक वाद्यांना प्राधान्य द्यावे : ठाणेदार दिलीप पोटभरे
भिसी पोलीस ठाण्याचे ठाणेदार दिलीप पोटभरे यांनी सर्व गणेश मंडळे, दुर्गा मंडळे, शारदा मंडळे तसेच इतर धार्मिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजकांना आवाहन केले की, उत्सव साजरे करताना कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाद्यांचा वापर टाळावा. पारंपरिक वाद्यांना प्राधान्य देऊन ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी सहकार्य करावे.
दरम्यान, पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणेश विसर्जन मिरवणूक काढणाऱ्या दोन्ही मंडळांचा भिसी पोलिसांनी केलेला सन्मान शहरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे. उत्सवाचा उत्साह जपत सामाजिक भान राखण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला असून, ‘ध्वनिप्रदूषणमुक्त उत्सव, संस्कृतीचा सन्मान’ ही संकल्पना अधिक बळकट होण्यास मदत होणार आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!