राम मंदिर बाल गणेश मंडळ, तळोधी (बा.) यांच्या वतीने मस्कऱ्या गणपती निमित्त आयोजित रक्तदान शिबिरात २८ रक्तदात्यांनी केले रक्तदान; आई व मुलाने पहिल्यांदाच केले रक्तदान तर नितीन भेंडाळे यांचे २१ वे रक्तदान
तळोधी (बा.):
स्थानिक राम मंदिर बाल गणेश मंडळ, तळोधी (बा.) च्या वतीने मस्कऱ्या गणपती उत्सवाचे औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी राम मंदिर परिसर येथे पार पडलेल्या या शिबिरात २८ देशप्रेमी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. ग्रामीण भागातील तरुणांनी सामाजिक बांधिलकी जपत घेतलेल्या या पुढाकाराचे सर्वत्र कौतुक होत आहे.
*१८ नवतरुणांचे प्रथमच पाऊल; आई-मुलाची अनोखी जोडी*
या शिबिराचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे तब्बल १८ रक्तदात्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच रक्तदान केले. यामध्ये आदेश नान्हे आणि त्यांची आई कविता नान्हे या माता-पुत्राच्या जोडीने एकत्र येऊन पहिल्यांदाच रक्तदान करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला. त्यांच्या या धाडसाचे आणि जागरूकतेचे शिबिरात विशेष कौतुक करण्यात आले.
*नितीन भेंडाळे यांचे २१ वे रक्तदान*
एकीकडे नवोदित रक्तदात्यांचा उत्साह दांडगा असताना, दुसरीकडे नियमित रक्तदाते नितीन भेंडाळे यांनी या शिबिरात २१ व्यांदा रक्तदान करून आपला सामाजिक वारसा पुढे चालू ठेवला. त्यांचा हा सातत्यपूर्ण उपक्रम इतर तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी ठरला आहे.
संयुक्त प्रयत्नातून शिबिर यशस्वी
रक्ताचा तुटवडा लक्षात घेता आणि गरजू रुग्णांना वेळेवर मदत मिळावी या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हा स्तुत्य उपक्रम यशस्वी करण्यासाठी राम मंदिर बाल गणेश मंडळाचे सर्व सदस्य आणि स्वाब नेचर केअर फाउंडेशनच्या सदस्यांनी अतोनात परिश्रम घेतले. शिबिराच्या यशस्वीतेबद्दल परिसरातील नागरिकांनी मंडळ व फाउंडेशनच्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!