वरोरा ऑप्टिकल असोसिएशनची कार्यकारिणी गठित

नूतन जुनघरे अध्यक्ष, सोनीश शेख उपाध्यक्ष तर कोषाध्यक्षपदी राजू चौधरी

महाराष्ट्र ऑप्टिकल असोसिएशनच्या तालुका प्रमुख पदी चेतन जुनघरे

तालूका - प्रतिनिधी ( जगदीश पेंदाम )

वरोरा : - वरोरा शहरात प्रथमच महाराष्ट्र ऑप्टिकल असोसिएशनची बैठक उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. या बैठकीचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे वरोरा ऑप्टिकल असोसिएशनची नवी कार्यकारिणी गठित करण्यात आली असून, ऑप्टिकल क्षेत्रातील व्यावसायिकांना संघटित करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.
नवीन कार्यकारिणीमध्ये नूतन जुनघरे यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सोनीश शेख यांची उपाध्यक्षपदी निवड झाली असून राजू चौधरी यांच्याकडे कोषाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच चेतन जुनघरे यांची महाराष्ट्र ऑप्टिकल असोसिएशनच्या वतीने वरोरा तालुका प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीच्या निवडीनंतर उपस्थित सदस्यांनी पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या. वरोरा आणि परिसरातील ऑप्टिकल व्यावसायिकांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या व्यावसायिक समस्या संघटनेच्या माध्यमातून मांडणे आणि क्षेत्राच्या प्रगतीसाठी एकजुटीने काम करणे, ही नव्या कार्यकारिणीपुढील महत्त्वाची जबाबदारी राहणार आहे.
३० ऑगस्ट रोजी वरोरा शहरातील आलिशान सभागृहात झालेल्या या बैठकीला महाराष्ट्र ऑप्टिकल असोसिएशनच्या अध्यक्षा प्रज्ञा मोदी यांची प्रमुख उपस्थिती होती. नागपूर ऑप्टिकल असोसिएशनचे सचिव तथा महाराष्ट्र ऑप्टिकल असोसिएशनचे विदर्भ प्रदेश प्रमुख संजय डबली आणि महाराष्ट्र ऑप्टिकल असोसिएशनचे नागपूर जिल्हा प्रमुख आशिष कन्हेरे यांची विशेष उपस्थिती लाभली.
यावेळी प्रज्ञा मोदी यांनी महाराष्ट्र ऑप्टिकल असोसिएशनची भूमिका आणि संघटनेशी संलग्न झाल्यामुळे व्यावसायिकांना होणारे फायदे याबाबत मार्गदर्शन केले. ऑप्टिकल क्षेत्रातील व्यावसायिकांनी एकत्र येऊन संघटनात्मक बळ वाढविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला वरोरा परिसरासह चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यातील ३० हून अधिक ऑप्टिकल क्षेत्रातील व्यावसायिक उपस्थित होते. विविध भागांतील व्यावसायिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळाल्याने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
वरोरा शहरात प्रथमच महाराष्ट्र ऑप्टिकल असोसिएशनच्या माध्यमातून नवीन संघटनात्मक बांधणी करण्यात आली असून, नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून ऑप्टिकल क्षेत्रातील व्यावसायिकांच्या प्रश्नांना आणि हितसंबंधांना अधिक प्रभावीपणे वाचा फोडली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
एकता, सहकार्य आणि प्रगती या ध्येयाने वरोरा ऑप्टिकल असोसिएशनची नवी कार्यकारिणी आगामी काळात कार्यरत राहणार असून, या संघटनेच्या स्थापनेमुळे वरोरा तालुक्यातील ऑप्टिकल क्षेत्राला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!