विदर्भ युवा क्रांती संघटनेच्या लढ्याला मोठे यश; रस्ता नूतनीकरणासह एसटी बससेवेची मागणी मान्य!

कोरंभी–खाक्षी–ठाणा परिसरातील युवकांच्या एकजुटीचा विजय; रेती घाटांच्या अवजड वाहतुकीविरोधात पुढील लढ्याचा इशारा

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - पवनी,कोरंभी,खाक्षी,ठाणा,गोसेखुर्द धरण या महत्त्वाच्या मार्गाच्या दुरवस्थेविरोधात तसेच या मार्गावर नियमित एसटी बससेवा सुरू करण्याच्या मागणीसाठी विदर्भ युवा क्रांती संघटनेने उभारलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. संघटनेच्या आंदोलनानंतर प्रशासनाकडून रस्ता नूतनीकरणाची कार्यवाही आणि नियमित एसटी बससेवेबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून, जनतेच्या प्रश्नासाठी केलेल्या संघर्षाचा हा मोठा विजय मानला जात आहे.

या आंदोलनामध्ये कोरंभी, खाक्षी आणि ठाणा परिसरातील युवकांचा सक्रिय सहभाग राहिला. विदर्भ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष हर्षल वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे जिल्हाध्यक्ष दीपक सिंग टाक यांच्या नेतृत्वात हा लढा उभारण्यात आला.
पवनीपासून गोसेखुर्द धरणाकडे जाणारा हा मार्ग केवळ स्थानिक वाहतुकीसाठीच नव्हे, तर नागरिक, विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि पर्यटकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. उमरेड–करांडला–पवनी अभयारण्य, धार्मिक स्थळे, गोसेखुर्द धरण तसेच पावर प्लांट यामुळे या मार्गावर वर्षभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. मात्र अनेक वर्षांपासून रस्त्याची झालेली दुरवस्था नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली होती.

 या रस्त्याची दुरवस्था होण्यामागे सर्वात गंभीर कारण म्हणजे परिसरातील रेती घाटांमधून होणारी मोठ्या प्रमाणातील अवजड वाहतूक असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. क्षमतेपेक्षा अधिक भार घेऊन धावणाऱ्या अवजड वाहनांच्या सातत्यपूर्ण वाहतुकीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ताण पडत असून, रस्त्याची झपाट्याने झीज होत असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. प्रशासनाकडून करण्यात येणारी तात्पुरती डागडुजी पावसात वाहून गेल्यानंतर पुन्हा रस्त्याची तीच अवस्था होत असल्याने कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी करण्यात आली होती.

याचबरोबर कोरंभी, खाक्षी, ठाणा व परिसरातील विद्यार्थ्यांसह नागरिकांसाठी नियमित एसटी बससेवा उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या. त्यामुळे रस्ता नूतनीकरण आणि नियमित एसटी बससेवा या दोन प्रमुख मागण्या घेऊन संघटनेने प्रशासनाविरोधात ठिय्या आंदोलनाचा मार्ग स्वीकारला.

जिल्हाध्यक्ष दीपक सिंग टाक यांनी या प्रश्नासंदर्भात यापूर्वीही प्रशासनाकडे अनेक वेळा निवेदने दिली होती. मात्र वारंवार निवेदने देऊनही प्रश्नाची अपेक्षित दखल घेतली जात नसल्याने अखेर आंदोलन पुकारण्यात आले. आंदोलनाची तीव्रता आणि नागरिकांचा वाढता सहभाग पाहता प्रशासनाला या प्रश्नाची दखल घ्यावी लागली आणि दोन्ही प्रमुख मागण्यांच्या दिशेने सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

“रस्त्यासाठी लढा दिला, रस्ता मंजूर करून घेतला; बससेवेसाठी आवाज उठवला, बससेवेचा मार्ग मोकळा करून घेतला,” अशी प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त करण्यात आली.

मात्र, “रस्ता मंजूर झाला म्हणजे लढा संपला नाही”, अशी स्पष्ट भूमिका विदर्भ युवा क्रांती संघटनेने घेतली आहे. नूतनीकरण झाल्यानंतर पुन्हा त्याच अवजड रेती वाहतुकीमुळे रस्ता खराब झाला, तर यावेळी केवळ रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी न करता रेती घाटांमधून होणाऱ्या अवजड वाहतुकीविरोधात थेट आंदोलन उभारले जाईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

त्यामुळे आगामी काळात रेती घाटांच्या वाहतुकीवर नियंत्रण, अवजड वाहनांवर कारवाई आणि रस्त्याची गुणवत्ता कायम राखण्यासाठी प्रशासन काय भूमिका घेते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. जनतेच्या प्रश्नासाठी पुन्हा एकदा आंदोलनाची भूमिका घेतली जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही आंदोलनकर्त्यांकडून संकेत देण्यात आले आहेत.

कोरंभी, खाक्षी आणि ठाणा परिसरातील युवकांची एकजूट, विदर्भ युवा क्रांती संघटनेचे नेतृत्व आणि जनतेच्या प्रश्नासाठी उभारलेला संघर्ष यामुळे मिळालेले हे यश म्हणजे परिसरातील नागरिकांच्या एकजुटीचा विजय असल्याची भावना व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!