ब्रह्मपुरीच्या विकासाला ‘डीपीआर’ची दिशा द्या!

ब्रह्मपुरीच्या विकासाला ‘डीपीआर’ची दिशा द्या!

नगरसेवक अविनाश राजूरकरांची मुख्याधिकाऱ्यांकडे मागणी; १५ ते २० वर्षांचा विकास डोळ्यासमोर ठेवून सर्वंकष नियोजन करण्याचे आवाहन



ब्रह्मपुरी : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारा शहराचा विस्तार आणि त्यानुसार निर्माण होणाऱ्या नागरी सुविधांच्या गरजा लक्षात घेता ब्रह्मपुरी शहराच्या भविष्यातील विकासाचे शास्त्रशुद्ध नियोजन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शहराच्या सर्वंकष व नियोजित विकासासाठी एकात्मिक Detailed Project Report (DPR) तयार करून विकासकामांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करावा, अशी मागणी नगर परिषद सदस्य अविनाश आनंदाराव राजूरकर यांनी मुख्याधिकाऱ्यांकडे केली आहे. यासंदर्भात त्यांनी २७ ऑगस्ट रोजी निवेदन सादर केले.

शहराचा विकास केवळ आजच्या गरजा लक्षात घेऊन करण्याऐवजी पुढील १५ ते २० वर्षांत वाढणारी लोकसंख्या, शहराचा विस्तार आणि नागरिकांच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे राजूरकर यांनी निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे ब्रह्मपुरीच्या विकासासाठी स्वतंत्र आणि सर्वंकष DPR तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

या DPR मध्ये शहरातील प्रमुख तसेच अंतर्गत रस्त्यांचे सुधारीकरण, डांबरीकरण व काँक्रीटीकरण, भविष्यातील पाणीपुरवठ्याचे नियोजन, सांडपाणी व भूमिगत गटार व्यवस्था, पावसाच्या पाण्याचा निचरा आणि जलभरावाच्या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना यांचा समावेश करण्याची मागणी आहे.

त्याचबरोबर घनकचरा व्यवस्थापन व कचरा प्रक्रिया व्यवस्था, LED स्ट्रीट लाईट, आवश्यक ठिकाणी नवीन प्रकाश व्यवस्था, चौक व उद्यानांचे सुशोभीकरण, फुटपाथ व पादचारी सुविधा, पार्किंग व्यवस्था, सार्वजनिक स्वच्छतागृहे, वाहतूक व्यवस्थेतील सुधारणा, हरित क्षेत्र व वृक्षारोपण तसेच आधुनिक डिजिटल नागरी सुविधा यांचाही विचार करण्याचे सुचविण्यात आले आहे.

ब्रह्मपुरीच्या विकासासाठी केवळ कामे मंजूर करून घेणे पुरेसे नसून त्यांना प्राधान्यक्रम, निधीचे संभाव्य स्रोत आणि टप्प्याटप्प्याने अंमलबजावणीचे नियोजन असणे गरजेचे आहे. त्यासाठी तांत्रिक सर्वेक्षण, GIS मॅपिंग, अंदाजपत्रक, BOQ आणि तांत्रिक आराखडे तयार करण्याची मागणी करण्यात आली आहे.

DPR तयार करण्यासाठी आवश्यक असल्यास पात्र Project Management Consultant (PMC) अथवा तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती करून सर्वंकष अहवाल तयार करावा. त्यानंतर उपलब्ध शासकीय योजना, विशेष अनुदान अथवा अन्य योग्य निधीच्या माध्यमातून विकासकामांना निधी मिळविण्यासाठी सक्षम प्राधिकरणाकडे प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी राजूरकर यांनी केली आहे.

ब्रह्मपुरी शहराचा विस्तार वेगाने होत असताना आजच्या समस्यांवर तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा उद्याच्या ब्रह्मपुरीचा विचार करून विकासाचे नियोजन करण्याची हीच योग्य वेळ आहे, अशी भूमिका या निवेदनातून मांडण्यात आली आहे. आता नगर परिषद प्रशासन या मागणीची किती गांभीर्याने दखल घेते आणि ब्रह्मपुरीच्या पुढील दोन दशकांच्या विकासाचा आराखडा प्रत्यक्षात कधी तयार होतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!