निष्टी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी नवीन शालेय व्यवस्थापन समिती स्थापन
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि.२४/०९/२०२६ जि.प.उच्च प्राथ.शाळा निष्टी,केंद्र भुयार,पं.स.पवनी येथे दि.२३ सप्टेंबर रोजी नवीन शालेय व्यवस्थापन समितीची शैक्षणिक सत्र-२०२४ ते २६ या कालावधीसाठी खेळीमेळीच्या व उत्साहपूर्ण वातावरणात गठित करण्यात आली.
यावेळी गोपिचंद डहारे यांची अध्यक्षपदी,तर दामिनी डहारे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच समितीच्या सर्व १३ सदस्यांचा शाळेच्या वतीने पुष्पगुच्छ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमास केंद्रप्रमुख आशिष डोंगरे,शाळेचे मुख्याध्यापक अंकुश कामडी,शिक्षिका लीना काटेखाये,ग्रामपंचायत सदस्य,अंगणवाडी सेविका तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांनी नवीन शालेय व्यवस्थापन समितीच्या सदस्यांचे अभिनंदन करून शाळेच्या शैक्षणिक व भौतिक विकासासाठी शुभेच्छा दिल्या.
नवनिर्वाचित अध्यक्ष गोपिचंद डहारे यांनी मनोगत व्यक्त करताना, शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी, शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी तसेच विद्यार्थ्यांच्या हितासाठी समितीच्या माध्यमातून प्रामाणिकपणे व एकजुटीने कार्य करण्याची ग्वाही दिली.शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षक, पालक, ग्रामस्थ व शालेय व्यवस्थापन समिती यांच्यात समन्वय आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
मुख्याध्यापक कामडी यांनी नवीन समितीचे स्वागत करून शाळेच्या विकासासाठी सर्व सदस्यांनी सक्रिय सहभाग नोंदवावा व आवश्यक ते सहकार्य करावे,असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीकृष्ण हाडगे यांनी तर आभारप्रदर्शन सत्यवान बावनगडे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवृंद, शालेय विद्यार्थी तथा पालक वर्ग यांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!