आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील ६४० शेतकऱ्यांना मोठा दिलासा; १८.२२ कोटींच्या अनुदानाचा शासन आदेश निर्गमित!

कृषी यांत्रिकीकरण योजनेतील शेतकऱ्यांच्या अडचणींची संवेदनशील दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा ठरला यशस्वी

आ.मुनगंटीवार यांनी मानले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे आभार

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - शेतकऱ्याच्या कष्टाने उभ्या राहिलेल्या शेतीला आधुनिकतेची जोड मिळावी, या विश्वासाने ट्रॅक्टर व हार्वेस्टर खरेदी करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील ६४० शेतकऱ्यांच्या हक्काच्या १८ कोटी २२ लाख रुपयांच्या प्रलंबित अनुदानाचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. शासनाच्या कृषी यांत्रिकीकरण (STATE & SMAM) योजनेअंतर्गत प्रलंबित असलेल्या या अनुदानासाठी राज्य शासनाचा आदेश निर्गमित झाला असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीची संवेदनशील दखल घेत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रयजी भरणे यांच्याकडे सातत्याने ठाम पाठपुरावा केला होता. शेतकऱ्याने शासनाच्या योजनेवर विश्वास ठेवून कर्जाचा भार स्वीकारला, आपली आर्थिक जुळवाजुळव केली आणि यंत्रसामग्री खरेदी केली; त्यानंतर त्याच्या हक्काच्या अनुदानासाठी प्रतीक्षा करावी लागू नये, हीच भूमिका घेत आ. मुनगंटीवार यांनी हा प्रश्न शासनदरबारी लावून धरला. त्यांच्या या संवेदनशील आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाल्याने जिल्ह्यातील ६४० शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे.

शासनाच्या योजनेवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी कर्ज काढून तसेच स्वतःची आर्थिक जुळवाजुळव करून ट्रॅक्टर आणि हार्वेस्टर खरेदी केले होते. अनुदान मिळणार या अपेक्षेने त्यांनी आपली जबाबदारी पूर्ण केली; मात्र अनुदान दीर्घकाळ प्रलंबित राहिल्याने त्यांच्यावर आर्थिक भार वाढत होता. काही शेतकऱ्यांना आपली यंत्रसामग्री कृषी कार्यालयाच्या आवारात आणून उभी करण्याची वेळ आली होती. ही बाब आ. मुनगंटीवार यांनी गांभीर्याने घेत शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या रक्कमेपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा केला.

शेतकरी हा कोणत्याही कृषी योजनेचा केवळ लाभार्थी नसून, शासनाच्या योजनांच्या केंद्रस्थानी असलेला घटक आहे, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी सातत्याने मांडली. शासनाच्या योजनेवर विश्वास ठेवून शेतकऱ्याने कर्जाचा भार स्वीकारून यंत्रसामग्री खरेदी केली असेल, तर त्याला आपल्या हक्काच्या अनुदानासाठी कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची वेळ येणे योग्य नाही. त्यामुळे प्रलंबित अनुदानाचा प्रश्न तातडीने सोडविण्याची मागणी आ.मुनगंटीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि कृषिमंत्र्यांकडे केली होती.

कृषी यांत्रिकीकरणामुळे शेतीची कामे वेळेत पूर्ण होण्यासोबतच उत्पादन खर्च कमी करण्यास आणि आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यास मदत होते. मात्र अनुदानच वेळेत मिळाले नाही, तर योजनेचा अपेक्षित आर्थिक आधार शेतकऱ्याला मिळत नाही. हीच वस्तुस्थिती लक्षात घेऊन आ. मुनगंटीवार यांनी ६४० शेतकऱ्यांचे १८ कोटी २२ लाख रुपयांचे अनुदान उपलब्ध करून देण्याचा प्रश्न शासनाच्या निदर्शनास सातत्याने आणून दिला.

या पाठपुराव्यानंतर राज्य शासनाने आता या अनुदानासाठी आवश्यक आदेश निर्गमित केला आहे. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील ६४० पात्र शेतकऱ्यांच्या हक्काची १८ कोटी २२ लाख रुपयांची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. शासनाच्या निर्णयामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.या निर्णयाबद्दल आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि कृषिमंत्री दत्तात्रयजी भरणे यांचे आभार मानले आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाची संवेदनशील दखल घेत शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घेतल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच भविष्यात कृषी यांत्रिकीकरणाच्या STATE व SMAM योजनांमधील अनुदान वितरणात अनावश्यक विलंब होऊ नये आणि शेतकऱ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी अधिक प्रभावी यंत्रणा उभी करण्याची अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्याच्या कष्टाला शासनाच्या निर्णयाची साथ मिळाली की त्याला आर्थिक आधार आणि पुढील वाटचालीला नवे बळ मिळते. ६४० शेतकऱ्यांच्या हक्काच्या १८.२२ कोटी रुपयांसाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेला हा ठाम पाठपुरावा म्हणजे शेतकऱ्यांच्या अडचणींकडे संवेदनशीलतेने पाहत, त्यांचा प्रश्न शासनाच्या सर्वोच्च स्तरापर्यंत प्रभावीपणे पोहोचविणाऱ्या त्यांच्या सक्षम नेतृत्वाची ठोस प्रचिती आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!