मटनच्या भाजीवरून वाद विकोपाला; मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून

शंकरपूर येथे धक्कादायक घटना; कुराडीच्या प्रहाराने रमेश बीनकर यांचा मृत्यू

तालूका - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

चिमूर : - बहिणीला पाहुणचारासाठी आणलेले मटन अखेर लहान भावाच्या मृत्यूचे कारण ठरले. शंकरपूर येथे मटनच्या भाजीवरून दोन भावांमध्ये झालेला वाद विकोपाला गेल्याने मोठ्या भावाने घरातील कुराडीने लहान भावावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात लहान भावाचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास शंकरपूर येथे घडली.

रमेश श्रीराम बीनकर 55असे मृतकाचे नाव असून जगन श्रीराम बनकर 60असे आरोपीचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जगन, किशोर आणि रमेश हे तिघे भाऊ एकत्र राहत होते. किशोर हा अपंग असल्याने दोन्ही भाऊ त्याची जबाबदारी सांभाळत होते. दोघेही मिळेल ते काम करून आपला उदरनिर्वाह करीत होते.

बुधवारी रक्षाबंधनानिमित्त त्यांची बहीण शंकरपूर येथे आली होती. तिने तिन्ही भावांना राखी बांधल्यानंतर बहिणीच्या पाहुणचारासाठी घरात मटन आणण्यात आले होते. पाहुणचार आटोपल्यानंतर बहीण आपल्या गावाकडे निघून गेली.

दरम्यान, सायंकाळी मटनच्या भाजीवरून जगन आणि रमेश या दोघा भावांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी दोघेही दारूच्या नशेत असल्याचे सांगण्यात येत आहे. वाद वाढल्यानंतर जगन याने घरात असलेल्या कुराडीने रमेश यांच्या गड्यावर आणि डोक्यावर प्रहार केला. यात गंभीर दुखापत झाल्याने रमेश यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती शेजाऱ्यांनी पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेण्याची तसेच पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!