१५ व्या व १६ व्या वित्त आयोगाच्या निधीची चौकशी करा; चक जाटेपार ग्रामस्थांची मागणी
ग्रामसभेत कामांची माहिती न दिल्याचा आरोप; ८ दिवसांत चौकशी न झाल्यास पंचायत समितीसमोर ठिय्या आंदोलनाचा इशारा
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील चक जाटेपार ग्रामपंचायतीला १५ वा व १६ वा वित्त आयोग तसेच ग्रामपंचायत सामान्य फंड व पाणीपट्टीच्या माध्यमातून प्राप्त झालेल्या निधीतून करण्यात आलेल्या विविध विकासकामांची चौकशी करून खर्चाचा तपशील जाहीर करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनानुसार, चक जाटेपार ग्रामपंचायतीमध्ये विविध योजनांतर्गत प्राप्त झालेल्या निधीतून करण्यात आलेल्या कामांची सविस्तर माहिती ग्रामस्थांना देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. २७ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या ग्रामसभेदरम्यान ग्रामसेवक व सरपंच उपस्थित असतानाही कामांची माहिती न देता ग्रामसभा आटोपल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामपंचायतीच्या निधीतून नेमकी कोणती कामे करण्यात आली, त्यासाठी किती निधी खर्च करण्यात आला, कामांचा दर्जा व प्रत्यक्ष खर्च याबाबत सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
दरम्यान, येत्या आठ दिवसांत या प्रकरणाची चौकशी करून योग्य कार्यवाही न झाल्यास पंचायत समिती चिमूर येथे ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही चक जाटेपार येथील नागरिकांनी दिला आहे.
याबाबत गटविकास अधिकारी पंचायत समिती चिमूर यांच्याकडे निवेदन देऊन निधीच्या वापराबाबत पारदर्शक चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. यावेळी पीयूष नागोसे, निखिल नन्नावरे, प्रकाश वाघमारे, नितेश पोहणकर सुमित गाडगे, प्रशांत गाडगे, बंडू ढोक, कुंदन चहांदे, संजय नागोसे, अविनाश दडमल, प्रभाकर चौधरी, गणेश शेंडे, धनराज नवनागे, विनोद नवनागे,रामाजी शेंडे, राजेंद्र लोखंडे, विठोबा भरडे, लक्ष्मण खनदाटे, राजेंद्र राणे, ज्ञानेश्वर सावतागडे, प्रफुल चौधरी आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!