श्री पुंडलिक राऊत जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम
तळोधी बा. वार्ताहर : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसोबतच त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणारे जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कोजबी माल, पंचायत समिती नागभीड येथील शिक्षक श्री. पुंडलिक मारोती राऊत यांना यंदाच्या मानाच्या जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्री. पुंडलिक मारोती राऊत हे गेल्या १७ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून, यापूर्वी त्यांनी गोरवट व आकापूर येथेही उल्लेखनीय सेवा बजावली आहे. अध्यापन हे केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी त्यांनी वर्गाबाहेरही विविध उपक्रम राबविले. अष्टपैलू शिक्षक म्हणून त्यांनी नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी, क्रीडा, सांस्कृतिक व नवरत्न स्पर्धा, शैक्षणिक गुणवत्ता वृद्धिंगत करणे, डिजिटल शिक्षणाचा प्रभावी वापर तसेच सामाजिक व राष्ट्रीय उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविला आहे.
विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला प्राधान्य देत राऊत यांनी शिक्षणात नवनवीन प्रयोग केले. त्यांच्या या सातत्यपूर्ण व उल्लेखनीय कार्याची दखल घेत शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह, गौरवपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, माध्यमिक शिक्षण अधिकारी राजेश पाताळे, प्राथमिक शिक्षण अधिकारी अश्विनी सोनवणे यांच्यासह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी व मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
श्री. पुंडलिक राऊत यांना जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल नागभीड तालुका प्रशासन व शिक्षण विभाग, सहकारी शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, विद्यार्थी, मित्रपरिवार तसेच शिक्षणप्रेमींकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या गौरवामुळे कोजबी माल शाळेसह संपूर्ण नागभीड तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या यशाबद्दल त्यांनी संवर्ग विकास अधिकारी स्नेहल लाड, गटविकास अधिकारी संजय पालवे, शिक्षण विभाग, केंद्रप्रमुख राजेंद्र हटवार, मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक, विद्यार्थी, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि मित्रपरिवाराचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना श्री. पुंडलिक राऊत म्हणाले, “हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून माझे गुरुजन, विद्यार्थी, सहकारी यांचे सहकार्य आणि पालकांनी दाखविलेल्या विश्वासाचे फलित आहे. या पुरस्कारामुळे भविष्यात आणखी उत्तम कार्य करण्याची प्रेरणा मिळाली आहे.”
त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत असून, त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाची नवी दिशा मिळत असल्याचे मत व्यक्त होत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!