शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर काँग्रेसचा आक्रोश; 18 सप्टेंबरला चिमुरात महामोर्चा
पिकविमा, कर्जमाफी, दुष्काळ जाहीर करण्यासह विविध मागण्या घेऊन तहसील कार्यालयावर धडकणार
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा चिमूर तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून सोयाबीन व कापूस या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी तसेच विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चिमूर तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने 18 सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांचा जनआक्रोश महामोर्चा काढण्यात येणार आहे.
काँग्रेस विधिमंडळ नेते तथा ब्रह्मपुरीचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात दुपारी 12 वाजता पंचायत समिती परिसरातून मोर्चाला सुरुवात होऊन तो तहसील कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चात चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार अभिजित वंजारी, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा माजी आमदार सुभाष धोटे आणि महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार सहभागी होणार आहेत.
सन 2025-26 चा पीकविमा भरूनही नुकसानभरपाई न मिळालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देणे, चिमूर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करणे, शेतकऱ्यांचे 7/12 कोरे करणे, पीककर्ज माफ करणे, धानाचा बोनस देणे, घोषित 50 हजार रुपयांचे अनुदान तातडीने देणे, स्मार्ट मीटर बंद करणे आदी मागण्या करण्यात येणार आहेत. तसेच लाडक्या बहिणींचे बंद केलेले अनुदान सुरू करावे, इंदिरानगरमधील बेघरांना पट्टे द्यावेत, ई-पीक पाहणी करणाऱ्या कृषी मित्रांचे मानधन वाढवावे, अशीही मागणी आहे.
चिमूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांवर कारवाई करून निलंबन व गुन्हा दाखल करण्याची मागणीही काँग्रेसने केली आहे. जलजीवन मिशनमधील कथित 52 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
महामोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन सरकारला जागे करावे, असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. विजय गावडे पाटील यांनी पत्रकार परिषदेत केले.
पत्रकार परिषदेला प्रा. राम राऊत, धनराज मुंगले, जुनेद खान, गजानन बुटके, सुभाष बनसोड, किशोरबापू शिंगरे, विजय घरत, देवा मुंगले, घनश्याम चाफले, रामदास चौधरी, प्रा. अरुण टिपले, इरफान पठाण, नागेश चट्टे, बब्बू खान, संदीप कावरे, पांडुरंग डोये, दुर्योधन तांबरभोगे, शांताराम सेलवटकर आदी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!