पवनी नगरपरिषदेत स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा; गुणवंत विद्यार्थी, शिक्षक व देशसेवकांचा गौरव
तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )
पवनी : - दि. १५ ऑगस्ट २०२६ : पवनी नगरपरिषद कार्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिनाचा ७९ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष डॉ. सौ. विजया राजेश नंदुरकर ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण सोहळा पार पडला. यावेळी उपाध्यक्ष, मुख्याधिकारी, नगरसेवक, नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी तसेच पवनी शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमानिमित्त पवनी शहरातील गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. इयत्ता १० वी व १२ वी परीक्षेत तसेच शिष्यवृत्ती परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
यावेळी पवनी नगरपरिषद शाळेतील नुकतेच सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक तसेच कार्यरत शिक्षकांचा शाल व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात शिक्षकांनी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच पवनी शहरातील पोलीस दल, अग्निवीर आणि CRPF मध्ये नुकतीच निवड झालेल्या युवकांचा व त्यांच्या कुटुंबीयांचा यथोचित सत्कार करण्यात आला. देशसेवेसाठी पुढे आलेल्या या युवकांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या त्यागाला वंदन करण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष डॉ. सौ. विजया राजेश नंदुरकर ठाकरे यांनी पवनीच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. “शिक्षणाचा सन्मान, देशसेवेचा अभिमान—हेच पवनीचे ध्येय” असल्याचे त्यांनी सांगितले.
शिक्षण, सेवा आणि देशभक्तीची परंपरा जपत पवनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांनी एकजुटीने योगदान द्यावे, असा संदेश देत कार्यक्रमाचा समारोप “जय हिंद! वंदे मातरम्!” या घोषणांनी करण्यात आला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!