वाळू माफिया–पोलीस संबंधांच्या चौकशीसाठी पत्रकारांचे लक्षवेधी आंदोलन; दोषींवर कारवाईची मागणी
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे पत्रकारांवर वाळू माफियाने खोटी तक्रार दिल्याचा आरोप असून, कोणतीही सखोल चौकशी न करता खंडणीसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा आरोप पत्रकारांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, या मागणीसाठी १६ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ७ वाजता तहसील कार्यालय, चिमूरसमोर पत्रकारांचे एकदिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले.
आंदोलनापूर्वी हुतात्मे तसेच घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, संत तुकडोजी महाराज, वीर शहीद बालाजी रायपूरकर आणि रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्प व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर आंदोलनस्थळी बसून लक्षवेधी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.
दरम्यान, वाळू माफिया, दलाल आणि पोलिसांमध्ये कथित आर्थिक व्यवहारासंदर्भातील ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसारित झाल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला. या क्लिपमध्ये तहसीलदार, उपविभागीय अधिकारी (SDM), उपविभागीय पोलीस अधिकारी, LCB तसेच काही व्यक्तींच्या नावांचा उल्लेख असल्याचे पत्रकारांचे म्हणणे आहे. या सर्व आरोपांची सत्यता अधिकृत तपासातून स्पष्ट व्हावी, अशी मागणी करण्यात आली.
या प्रकरणाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी साहिल झरकर, ब्रह्मपुरी यांच्याकडे असल्याचे सांगण्यात येत असून, चौकशीची सद्यस्थिती काय आहे आणि आरोपांमध्ये तथ्य आढळल्यास संबंधितांविरुद्ध गुन्हे का दाखल करण्यात आले नाहीत..? असा सवाल आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
जनतेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या यंत्रणेवरच आरोप होत असतील, तर त्याची निष्पक्ष चौकशी होणे अत्यावश्यक आहे. वाळू माफिया आणि पोलिसांमध्ये कथित आर्थिक व्यवहार झाला असल्यास तो तपासाअंती सिद्ध व्हावा अथवा आरोप खोटे असल्यास तेही स्पष्ट व्हावे, अशी भूमिका पत्रकारांनी मांडली.
या आंदोलनाला समस्त चिमूर तालुका पत्रकार संघ, काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष माधवबापू बिरजे, शिवसेना शिंदे गटाचे तालूका अध्यक्ष विलास डांगे,वैभव डांगे, काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश ओबीसी विभाग उपाध्यक्ष धनराजजी मुंगले, जुनेद खान अल्पसंख्यांक काँग्रेस, माजी सभापती शांताराम शेलवटकर पंचायत समिती चिमूर ,प्रशांत डवले,बब्बू खान,वंचित बहुजन आघाडी चे नारायण कांबळे सर,चंदू मडकवार, तसेच परिसरातील अन्य नागरिकांनी भेट देऊन समर्थन जाहीर केले. दोषींवर कारवाई झालीच पाहिजे आणि संपूर्ण सत्य जनतेसमोर आले पाहिजे, अशी मागणी उपस्थितांनी केली. गरज पडल्यास काँग्रेस पक्ष पत्रकारांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.
शांततेच्या मार्गाने करण्यात आलेल्या या आंदोलनाची सांगता करण्यात आली. मात्र, प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही, तर आंदोलनाला पुढील काळात अधिक व्यापक स्वरूप दिले जाईल, असा इशारा आंदोलनकर्त्या पत्रकारांनी दिला. निष्पक्ष चौकशी करून दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई होईपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धारही पत्रकारांनी व्यक्त केला.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!