फुले दाम्पत्य स्मारक सौंदर्यीकरणावरून भाजपचे ठिय्या आंदोलन
फुले दाम्पत्य स्मारक सौंदर्यीकरणावरून भाजपचे ठिय्या आंदोलन; मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर दोन दिवसांची स्थगिती
मूल | प्रतिनिधी
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या सौंदर्यीकरणासाठी मंजूर झालेल्या २५ लाख रुपयांच्या कामाला तब्बल नऊ महिने उलटूनही प्रत्यक्ष सुरुवात न झाल्याने भारतीय जनता पक्षाने मंगळवारी मूल नगर परिषद मुख्याधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन छेडले. सुमारे दोन तास चाललेल्या आंदोलनानंतर मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी या स्मारकाच्या सौंदर्यीकरणाची मागणी आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे केली होती. त्यानंतर आमदारांनी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करून कार्यारंभ आदेशही देण्यात आला. मात्र सुमारे नऊ महिने उलटूनही कामासाठी आवश्यक ले-आऊट व पुढील प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
आंदोलन सुरू असताना मुख्याधिकारी शासकीय कामानिमित्त नागपूर येथे असल्याने त्यांनी दूरध्वनीद्वारे भाजप शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांच्याशी संपर्क साधून दुसऱ्या दिवशी शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याची तयारी दर्शविली. दरम्यान, पोलीस निरीक्षक राठोड यांनी मध्यस्थी करत आंदोलन स्थगित करून चर्चेत सहभागी होण्याचे आवाहन केले.
त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर भाजपने आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, चर्चेत समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशारा भाजप शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांनी दिला.
या आंदोलनात शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष चंदू मारगोणवार, ज्येष्ठ नेते मोतीलाल टहलियानी, प्रा. किरणताई कापगाते, माजी नगराध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, नगरसेविका उषा शेंडे, अश्विनी निकोडे, प्राची आक्केवार, महामंत्री जितेंद्र टिंगुसले, प्रशांत बोबाटे, डॉ. गुरु भेंडारे, प्रा. सुधीर नागोशे, महिला आघाडी अध्यक्षा मनीषा गांडलेवार, महिला महामंत्री आशा गुप्ता, युवा उपाध्यक्ष सूरज मांडाळे, विवेक मांडाळे, राकेश मोहूर्ले, संदीप मोहब्बे, रुपेश निकोडे, आनंद आक्केवार, युवराज चावरे, गीता अमदुरतिवार, गौतम जीवने, सुनील कुकुडकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!