मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर भाजपचे ठिय्या आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित
मूल, दि. ४ ऑगस्ट :
क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकाच्या सौंदर्यीकरणाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, या मागणीसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने मंगळवारी नगर परिषद मुख्याधिकारी दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करण्यात आले.
भाजप पदाधिकाऱ्यांनी या स्मारकाच्या सौंदर्यीकरणासाठी आमदार तथा माजी अर्थ व नियोजन मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार आमदार मुनगंटीवार यांनी या कामासाठी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. मात्र, कार्यारंभ आदेशाला सुमारे नऊ महिने उलटूनही ले-आऊट न मिळाल्याने प्रत्यक्ष काम सुरू झाले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला.
सुमारे दोन तास आंदोलन सुरू असताना मुख्याधिकारी शासकीय कामानिमित्त नागपूर येथे असल्याने त्यांनी भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून दुसऱ्या दिवशी शिष्टमंडळासोबत चर्चा करण्याची विनंती केली. पोलीस निरीक्षक राठोड यांनीही मध्यस्थी करून आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केले. सुरुवातीला आंदोलक त्यासाठी तयार नव्हते. अखेर मुख्याधिकाऱ्यांच्या वतीने लेखी आश्वासन देण्यात आल्यानंतर प्रवीण मोहूर्ले यांनी आंदोलन दोन दिवसांसाठी स्थगित करण्याची घोषणा केली.
यावेळी प्रवीण मोहूर्ले यांनी, "उद्याच्या चर्चेत समाधानकारक निर्णय न झाल्यास आंदोलन पुन्हा सुरू करण्यात येईल," असा इशाराही दिला.
या आंदोलनात भाजप शहराध्यक्ष प्रवीण मोहूर्ले यांच्या नेतृत्वाखाली तालुकाध्यक्ष चंदू मारगोणवार, ज्येष्ठ नेते मोतीलाल टहलियानी, प्रा. किरणताई कापगते, मिलिंद खोब्रागडे, माजी नगराध्यक्ष उषा शेंडे, नगरसेविका अश्विनी निकोडे, नगरसेविका प्राची आक्केवार, महामंत्री जितेंद्र टिंगुसले, प्रशांत बोबाटे, डॉ. गुरु भेंडारे, प्रा. सुधीर नागोशे, महिला आघाडी अध्यक्षा मनीषा गांडलेवार, महिला महामंत्री आशा गुप्ता, युवा उपाध्यक्ष सूरज मांदाळे, विवेक मांदाळे, सामाजिक कार्यकर्ते राकेश मोहूर्ले, संदीप मोहब्बे, रुपेश निकोडे, आनंद आक्केवार, युवराज चावरे, गीता आमदुरतिवार, गौतम जीवने, सुनील कुकुडकर यांच्यासह असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!