जनकापूर येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू; परिसरात भीतीचे वातावरण




तळोधी (बा.), दि. ४ ऑगस्ट : नागभीड तालुक्यातील जनकापूर येथील जंगलालगतच्या शेतात वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे जनकापूरसह परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मृत शेतकऱ्याचे नाव रमेश जयराम काशीवार (वय ५५) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, रमेश काशीवार हे दुपारच्या सुमारास जंगलालगतच्या शेतात रोपांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
सायंकाळपर्यंत ते घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. शोधादरम्यान ते शेतात मृतावस्थेत आढळून आले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाला कळविण्यात आले असून, वृत्त लिहीपर्यंत वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचण्याची प्रक्रिया सुरू होती. मृतदेह घटनास्थळीच असल्याची माहिती मिळाली.
या घटनेमुळे जनकापूर व आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जंगलालगतच्या शेतात कामासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, तसेच वन विभागाने वाघाचा तातडीने बंदोबस्त करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
हेडलाईन :
जनकापूर येथे वाघाचा हल्ला; शेतकऱ्याचा मृत्यू, परिसरात भीतीचे सावट

1 टिप्पणी:

झिंदाबाद!