सावित्रीबाई फुले विद्यालयात ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

तालूका - प्रतिनिधी ( शेखर जिभकाटे )

पवनी : - दि.१६/०८/२०२६ सावित्रीबाई फुले विद्यालय,पवनी येथे भारतीय स्वातंत्र्याचा ८० वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.सकाळी- ८.००
वा.विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली तसेच महाराष्ट्र ग्रामीण विकास शिक्षण संस्था, खांबाडी/बोरगावचे कोषाध्यक्ष भिमराव वाहने यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सेवानिवृत्त ग्राम विकास अधिकारी संतोष धांडे, सेवानिवृत्त शिक्षक दिवाकर गोवर्धन,सेवानिवृत्त लिपिक भाऊराव रंगारी,तसेच पालकवर्ग रविंद्र चन्नेवार,लंकेश्वर मुंडले, संगीता चन्नेवार,आरती मेश्राम आदी उपस्थित होते.

स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर संगीत कवायत, भाषणे,गीतगायन,वादन व नृत्याचे बहारदार सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण विद्यालय परिसर देशभक्तीच्या रंगात न्हाऊन निघाला.

यावेळी विद्यालयात आयोजित, तसेच स्काऊट व गाईड मध्ये विविध स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य पुरस्कृत शिक्षक अशोक गिरी यांनी प्रभावीपणे केले,तर अरुणा कांबळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप मुंडले,ललिता डेकाटे,अर्चना दडवे, स्मिता मोहरकर,प्रतिक रंगारी, काजल नाकाडे तसेच विद्यार्थ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

देशभक्ती, विद्यार्थ्यांचा उत्साह आणि गुणवंतांचा गौरव यामुळे सावित्रीबाई फुले विद्यालयातील स्वातंत्र्य दिन सोहळा अविस्मरणीय ठरला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!