चिमूर नगर परिषदेच्या कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांवर प्रश्नचिन्ह!

नव्याने बांधलेल्या नालीची भिंत कोसळली

निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर स्थानिक नागरिकांकडून रोष 

उप संपादक 
विलास मोहिणकर 

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यात येत असलेल्या चिमूर नगर परिषद हद्दीत कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांवर मोठ्या प्रमाणात खर्च होत असताना काही ठिकाणी होत असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शहरातील रस्ते व नाली बांधकामांमध्ये निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरून कामे करण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात असून, त्याचे प्रत्यक्ष उदाहरण चिमूर–गदगाव–भिसी मार्गावर पाहायला मिळत आहे.
उपजिल्हा रुग्णालयाच्या संरक्षक भिंतीलगत (वॉल कंपाउंड) लगत नुकतेच बांधण्यात करण्यात आलेल्या नालीच्या भिंतीच्या भाग कोसळल्याने संबंधित कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. धक्कादायक बाब म्हणजे, कोसळलेल्या भागाला तात्पुरता आधार देण्यासाठी नालीच्या मध्यभागी लाकडी ठोकळे लावण्यात आले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हे काम किती निकृष्ट दर्जाचे झाले, याबाबत शहरात चर्चा रंगू लागली आहे.
विशेष म्हणजे, अद्याप परिसरात अतिवृष्टीसारखी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली नसतानाही नालीची अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे भविष्यात मुसळधार पाऊस झाल्यास ही नाली पूर्णपणे कोसळण्याची तसेच परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या कामाची तातडीने उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून दोषी कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच निकृष्ट दर्जाचे काम पुन्हा करून नागरिकांच्या पैशांचा अपव्यय थांबवावा, अशीही मागणी जोर धरत आहे.

चिमूर शहरातील विकासकामांमध्ये पारदर्शकता, दर्जेदार कामे आणि जबाबदारी निश्चित करण्याची वेळ आता आली असून, संबंधित प्रशासन या प्रकरणाची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!