छत्तीसगडमधून घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; ₹3 लाखांची चोरीची रोकड जप्त
छत्तीसगडमधून घरफोडी करणारा आरोपी जेरबंद; ₹3 लाखांची चोरीची रोकड जप्त
चंद्रपूर | प्रतिनिधी
चंद्रपूर शहरातील घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्तीसगडमधून एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून चोरीतील ₹3 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे घरफोडीच्या गंभीर गुन्ह्याचा उलगडा झाला आहे.
रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डी.एस.के. ग्रीन कॉलनी येथील एका कार्यालयातून 27 जुलै 2026 रोजी ₹6 लाखांची रोख रक्कम चोरीला गेली होती. याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे संशयित वलेश कुमार हल्बा उर्फ बुवारिया (वय 38, रा. रेंगाकठेरा, जि. राजनांदगाव, छत्तीसगड) याचा शोध घेऊन त्याला छत्तीसगडमधून ताब्यात घेतले.
पोलीस चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्या कबुलीजबाबावरून पंचांसमक्ष ₹3 लाखांची रोख रक्कम जप्त करण्यात आली असून उर्वरित रकमेचा शोध सुरू आहे. पुढील तपासासाठी आरोपीला रामनगर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वातील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!