ग्रामपंचायत सावरी (बिड) नाली व शोषखड्डा प्रकरणी चिमूर येथे पत्रकार परिषद
सदर समस्येकडे निराकरण प्रशासनाने लक्ष देऊन निराकरण करावे - सरपंच लोकनाथ रामटेके
उप संपादक
विलास मोहिणकर
चंद्रपूर : - दि. १७ जून : ग्रां.पं. सावरी (बिड) अंतर्गत वार्ड क्र. २ मध्ये सन २०२४-२५ या आर्थिक वर्षात नाली बांधकामाचे काम मंजूर करण्यात आले होते. सदर नालीचे बांधकाम ग्रामपंचायत करण्यास तयार होती. स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार हे काम प्रस्तावित करण्यात आले होते.
दरम्यान, सन २०२५ मध्ये श्री. रामदास खामणकर, श्री. सुरेश श्रीरामे व श्री. दुर्योधन श्रीरामे यांनी सांडपाण्याचा मार्ग अडविल्यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण झाली. सदर वाद सोडविण्यासाठी ग्रामपंचायत पदाधिकारी घटनास्थळी गेले असता संबंधितांकडून अरेरावीची भाषा वापरून हुज्जत घालण्यात आली. त्यानंतर हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली, मात्र ती निष्फळ ठरली.
यानंतर श्री. रामदास खामणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी नालीऐवजी त्या ठिकाणी शोषखड्डा करण्यात यावा, अशी मागणी केली. ग्रामपंचायतीने सामंजस्याची भूमिका घेत सदर मागणी मान्य केली व त्यानुसार प्रस्ताव सादर करण्यात आला. मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सदर कामास मंजुरी दिल्यानंतर शोषखड्ड्याचे बांधकाम सुरू करण्यात आले.
शोषखड्ड्याचे पाणी ओव्हरफ्लो झाल्यास ते बाहेर जाण्यासाठी आउटलेट पाईपलाईन टाकण्याचेही निश्चित करण्यात आले होते. या निर्णयास श्री. रामदास खामणकर, श्री. लोकेश खामणकर, श्री. सुरेश श्रीरामे, श्री. दुर्योधन श्रीरामे व श्री. सखाराम श्रीरामे यांनी त्यावेळी संमती दर्शविली होती. संबंधित वेळी पोलीस प्रशासनही उपस्थित होते.
मात्र, शोषखड्ड्याचे काम पूर्णत्वास येत असताना आउटलेट पाईपलाईन न टाकता थेट स्लॅब टाकून काम पूर्ण करावे, अशी अट श्री. रामदास खामणकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घातली. यावर श्री. राजेंद्र महाकुलकर, श्री. नरेंद्र महाकुलकर, श्री. गजानन श्रीरामे व इतर नागरिकांनी हरकत घेतली. त्यांच्या म्हणण्यानुसार, भविष्यात पाणी ओव्हरफ्लो होऊन गंभीर समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी आउटलेट पाईपलाईन टाकणे अत्यावश्यक आहे.
या विषयावर दोन्ही पक्षांसोबत वारंवार चर्चा व बैठका घेण्यात आल्या, मात्र कोणताही तोडगा निघू शकला नाही. काम सुरू करण्यासाठी मजूर गेल्यास संबंधितांकडून अडथळा निर्माण करण्यात येतो तसेच गलिच्छ भाषेचा वापर करून काम करण्यास मज्जाव करण्यात येत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे.
सदर प्रकरणात मा. सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन शेगाव यांचीही मदत घेण्यात येत आहे. तथापि, अद्याप प्रश्न मार्गी लागलेला नाही. सध्या परिसरात सांडपाणी साचून राहत असल्याने दोन्ही पक्षांच्या कुटुंबियांना तसेच आसपासच्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
ग्रामपंचायतीची भूमिका नेहमीच सामंजस्याची असून कोणताही वाद न होता शांततेत काम पूर्ण करण्याची आहे. मात्र, काही व्यक्तींकडून खोटी माहिती वर्तमानपत्र व वार्ताहरांना देऊन ग्रामपंचायतीची बदनामी केली जात असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.
ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांशी सतत अयोग्य भाषेत वर्तन होत असल्याने अखेर ग्रामपंचायतीने पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती जनतेसमोर मांडल्याचे सांगण्यात आले.व सदर समस्येकडे प्रशासनाने लक्ष देऊन समस्यांचे निराकरण करावे असे आवाहन सरपंच लोकनाथ रामटेके यांनी केले.
यावेळी पत्रकार परिषदेत लोकनाथ रामटेके सरपंच , निखिल डोईजड उपसरपंच , दिलीप मोटघरे सदस्य , सुरेखा शेंबेकर सदस्य , अर्चना हनवते सदस्य , नलू शेंबडे सदस्य उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!