‘पवनीकरांना सुरक्षित, स्वच्छ आणि मूलभूत सुविधायुक्त शहर हवे’

रखडलेल्या विकासकामांवर काँग्रेसचा नगर परिषदेत धडक मोर्चा; मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

तालुका - प्रतिनिधी (शेखर जिभकाटे ) 

पवनी : - दि. १८ : “केवळ कागदोपत्री विकासकामे करून चालणार नाही. पवनीकरांना खड्डेमुक्त रस्ते, शुद्ध पाणी, सुरक्षित व स्वच्छ वातावरण देणे ही प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे,” असा स्पष्ट इशारा भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद विनोद साखरकर यांनी दिला.

पवनी शहरातील विविध प्रलंबित नागरी समस्यांविरोधात भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीने आक्रमक भूमिका घेत भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी च्या वतीने पवनी नगर परिषदेत धडक देत मुख्याधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

रामचंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या आंदोलनात शहरातील रस्त्यांची दुरवस्था, अपुरा पाणीपुरवठा, बंद पथदिवे आणि स्वच्छतेच्या प्रश्नांवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष साखरकर यांनी प्रशासनाच्या निष्क्रिय कारभारावर सडकून टीका केली.

नागरिकांच्या प्रमुख मागण्या

शहरातील सर्व खड्डे तातडीने बुजवून रस्ते खड्डेमुक्त करावेत. काँक्रीट रस्त्यांच्या कामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्यात यावी.

फिल्टर प्लांटची नियमित स्वच्छता करून नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा करावा. तसेच सोलर यंत्रणेची तातडीने दुरुस्ती करावी.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर साथीचे आजार रोखण्यासाठी नालेसफाई, औषध फवारणी आणि आरोग्य केंद्रात पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवावा.

किल्ला परिसरासह शहरातील अंधाराच्या भागात स्ट्रीट लाईट्स बसवाव्यात व आवश्यक ठिकाणी नवीन हँडपंप सुरू करावेत.

तलाव विकासकामांतील कथित अनियमिततेची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी.

प्रशासनाचे आश्वासन

मुख्याधिकाऱ्यांनी काँग्रेसच्या शिष्टमंडळाशी सविस्तर चर्चा करत शहरातील रस्त्यांच्या समस्या टप्प्याटप्प्याने सोडवण्याचे तसेच इतर मागण्यांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

पदाधिकाऱ्यांची मोठी उपस्थिती

या आंदोलनात मनोहर उरकुडकर, धर्मेंद्र नंदरधने, विकास राऊत, सदानंद धारगावे, ललिता खेडेकर, मीरा उरकुडकर, ताराबाई नागपुरे, रोहित खोब्रागडे, तरबेज खान, अवंती राऊत, राकेश बीसेन, कमलाकर रायपूरकर, मीना जीपकाटे, पी. ए. गजभिये, निशांत सतदेवे, वैशाली भोगे, एन. एस. साकोरे, अरुण मुंडले, धु. व. तीमांडे, नंदा सलामे, मनोज देशमुख, मनसाराम जीपकाटे यांच्यासह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.

“जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. सामान्य नागरिकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे हेच आमच्या आंदोलनाचे खरे यश आहे,” असेही मुकुंद विनोद साखरकर यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!